कळंब (जि. उस्मानाबाद) - कळंब शहरातून जाणाऱ्या व सध्या कायम काम प्रगतिपथावर असलेल्या खामगाव-पंढरपूर रस्त्याचे काम गतीनं केलं जात नाही. यातच खोदून ठेवलेला रस्ता ‘जम्पिंग ट्रॅक’ बनला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाेकांना ‘उंट सवारी’ची अनुभूती येत आहे.
विदर्भ टू पश्चिम महाराष्ट्र व्हाया मराठवाडा असा राज्यातील तीन प्रांतांसह विविध जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांना जोडणारा महात्त्वाकांक्षी महामार्ग म्हणून खामगाव-पंढरपूर या नव्या राष्ट्रीय महामार्गास मंजुरी देऊन गती देण्यात आली. साडेचारशे किलोमीटर लांबीच्या या महामार्गात कळंब ते बार्शी राज्यमार्गावरील तालुका हद्दीतील लांबी संलग्न झाली आहे. सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ हैदराबाद स्थित एका ‘मेगा’ ठेकेदाराकडून रस्त्याची बांधणी करून घेत आहे. यातच कळंब शहरातील चार किमी रस्त्याचा ‘विकास’ही हाती घेण्यात आला आहे. मात्र, जालना येथून उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या ‘रस्ते विकास’ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरातील काम हव्या त्या गतीने होत नाही.
चौकट...
© खडबडीत रस्ता जीवावर उठलाय...
खोदकाम करण्यात आलेल्या कामावर पुढील सबग्रेड कामे झालेली नाहीत. यामुळे खोदलेल्या रस्त्याचा जम्पिंग ट्रॅक झाला आहे. पाणी मारल्यानंतर वर्दळीमुळं यात भरच पडली आहे. येथून प्रवास करणारांना उंट सफारीचा अनुभव येत असला तरी ही अनुभूती मणका खिळखिळा तर हाडाचा खुळखुळा करणारी, अशी ठरत आहे.
उसाच्या ट्रॉलीपासून धोका?
कमालीच्या खडबडीत व ओबडधोबड बनलेल्या रस्त्यावरून विविध कारखान्यांच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीची सध्या वर्दळ सुरू आहे. या खराब भागात सदर ट्रॉली अक्षरशः झुलत आहेत. त्यांचा केंव्हा कडेलोट होईल याचा नेम नसल्याने शेजारची वाहने जीव मुठीत धरून मार्गस्थ होतायेत. यामुळे एखादा गंभीर धोका संभवत आहे.
संवेदना बोथट झाल्या, तुम्ही सहन करा...
शहरातील खामगाव-पंढरपूर रस्त्याच्या रखडलेेेल्या ओबडधोबड रस्त्यावर प्रवास करताना नाकी नऊ येत आहेत. या स्थितीत मुजोर कंपनी, निद्रिस्त रस्ते विकासचे अधिकारी यांच्यात ताळमेळ नसला तरी सामान्यांचे होणारे हाल इतरही कोणाला कसे दिसत नाहीत, असा संंतापजनक सवाल उपस्थित होत आहे. यामुळे ‘संवेदना बोथट झाल्या आहेत, तुम्ही सहन करा,’ असाच अनाहूत सल्ला मिळत आहे.
पाॅईंटर...
कळंब शहरातील दूध डेअरी ते परळी रोड भागात खोदलेल्या रस्त्यावरील काम धीम्या गतीनं सुरू आहे. यामुळे उद्यान, क्रीडा संकुल परिसर, होळकर चौक ते बसस्थानक या भागातील रस्ता प्रवासालायक राहिलेला नाही.