तुळजापूर : शहरापासून केवळ तीन कि.मी अंतरावर असलेल्या शिवरत्ननगर ते तडवळा-काक्रंबा या जवळपास ४ कि.मी. रस्त्याची चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनांचा अक्षरशः खुळखुळा हाेत आहे, तर चालकांचे मणके खिळखिळे हाेताहेत. असे असतानाही संबंधित यंत्रणेकडून रस्त्याच्या डागडुजीकडे डाेळेझाक केली जात आहे.
दहा-पंधरा वर्षांपूर्वी तुळजापूर खुर्द येथील शिवरत्ननगर ते तडवळा-काक्रंबा रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम झाले हाेते. यानंतर सुरुवातीची काही वर्षे रस्त्याची अवस्था चांगली हाेती. कालांतराने रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली. हे खड्डे वेळीच बुजविणे गरजेचे हाेते; परंतु संबंधित यंत्रणेकडून वेळाेवेळी डाेळेझाक केली गेली. त्यामुळे सध्या या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. परिणामी, ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, पर्यायी दुसरा मार्ग नसल्याने ग्रामस्थांना याच रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे वाहनांचा चक्क खुळखुळा हाेत आहे, तर चालकांचे मणके खिळखिळे हाेत आहेत. एवढेच नाही तर या मार्गावर लहान-माेठे अपघात घडत आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या डागडुजीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून हाेत आहे.
चाैकट...
तुळजापूर खुर्द येथील शिवरत्ननगर ते तडवळा या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. कित्येक निवडणूक आल्या आणि गेल्या. खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य गावात आले व गेले. मात्र, ग्रामस्थांना रस्ता दुरुस्तीच्या आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही.
ईसाक शेख, ग्रामस्थ, तडवळा.
रस्त्याची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे आजवर गावात महामंडळाची बस येऊ शकली नाही. आजही गावातील विद्यार्थ्यांना खड्डेमय रस्ता तुडवत शाळा गाठावी लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष वाढली आहेत. याचाही वाहनधारकांना त्रात हाेत आहे.
-धन्यकुमार कुलकर्णी, ग्रामस्थ, तडवळा.