उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरातील रस्त्यांची अवस्था लक्षात घेत लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांना चांगले दिवस येऊ घातले आहेत. नगर विकास विभागाने नुकतेच चार प्रमुख रस्त्यांसाठी तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे वर्षानुवर्षे खड्ड्यांत अडकलेले रस्ते गुळगुळीत होण्याचा मार्ग खुला झाल्याची माहिती गटनेते सोमनाथ गुरव यांनी दिली.
उस्मानाबाद शहरातील शांतीनिकेतन कॉलनी, महात्मा गांधी नगर, समर्थनगर, केशव नगर, बँक कॉलनी आदी भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली होती. रस्त्यांवरील वाहणारे सांडपाणी व तुंबलेली गटारे यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. रस्ते उखडून गेल्याने जागोजागी खड्डे पडले होते. वाहनचालकांची येथून जाता-येता मोठी कसरत सुरु होती. ही कसरत थांबविण्याच्या अनुषंगाने शिवसेना उपनेते आ. तानाजी सावंत, पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील व नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रस्त्याच्या कामासाठी निधीची मागणी करीत पाठपुरावा सुरु ठेवला होता. याअनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार नगरविकास विभागाने नुकताच या रस्त्यांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर केला आहे.
यातून रामा २३८ ते शिवणारायनी इंटरप्रायजेस ते राष्ट्रीय महामार्ग ५२ पर्यंत सिमेंट कॉंक्रिट रस्ता व नालीसाठी
२ कोटी १९ लाख रुपये, बँक कॉलनी ते राष्ट्रीय महामार्ग ५२ पर्यंतच्या (पूर्ण जुना उपळा रोड) रस्त्याची सुधारणा करण्यासाठी १ कोटी २६ लाख रुपये, महात्मा गांधी नगर येथे रस्ता व नाली करण्यासाठी ७० लाख तर समर्थ नगर व केशव नगर मध्ये सिमेंट कॉंक्रिट रस्ता व नाली करण्यासाठी ८४ लाख, असा सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती पालिकेतील गटनेते सोमनाथ गुरव यांनी दिली.