येडशी/उस्मानाबाद : तालुक्यातील येडशी येथील धाडशी चाेरींच्या घटनांचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. मंगळवारी रात्री पावणेदाेन वाजेच्या सुमारास समर्थनगर भागातील घराचा दरवाजा अज्ञात पाच ते सहा चाेरट्यांनी कटावणीच्या सहाय्याने ताेडून महिलेस लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. यानंतर चाेरट्यांनी गळ्यातील मंगळसूत्र तसेच कपाटातील ७४ ग्रॅम साेन्याचे दागिने घेऊन पाेबारा केला. या घटनेत संबंधित महिला गंभीर जखमी झाले आहे. सततच्या घटनांमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पाेलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह लावले जाऊ लागले आहे.
येडशी येथील समर्थनगर भागात द्वारका तुकाराम बेद्रे यांचे घर आहे. मंगळवारी मध्यरात्री पावणेदाेन वाजेच्या सुमारास पाच ते सहा चाेरटे दाखल झाले. त्यांनी कटावणीच्या सहाय्याने दरवाजा ताेडून आत प्रवेश मिळविला आणि द्वारका बेद्रे यांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. त्या गंभीर जखमी झाल्यानंतर चाेरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबडून घेतले. यानंतर लाेखंडी कपाटतील ७४ ग्रॅम वजनाचे दागिने घेऊन त्यांनी पाेबारा केला. ज्याची किंमत साधारपणे १ लाख ३३ हजार २०० रुपये एवढी आहे. यावेळी जखमी अवस्थेतील द्वारका बेद्रे यांनी आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूचे लाेक धावून आले आणि त्यांना प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्यांना गंभीर दुखापत झाली असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी बेद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध उस्मानाबाद ग्रामीण पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपाेनि शिंदे हे करीत आहेत. येडशीसह परिसरात सातत्याने चाेरीच्या घटना घडत आहेत. मात्र, चाेरांच्या मुसक्या आवळण्यात पाेलिसांना अद्यापही यश आले नाही. त्यामुळे चाेरट्यांचे मनाेबल उंचावले असून, अशा धाडशी चाेरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. परिणामी पाेलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच आता प्रश्नचिन्ह लावले जाऊ लागले आहे.
पाेलीस अधिकारी आले अन् कॅमेरे बसवा म्हणाले...लूटमारीची घटना समजताच पाेलीस अधीक्षक निवा जैन, अपर पाेलीस अधीक्षक कावत, पाेलीस उपअधीक्षक अंजुम शेख, पाेनि सुरेश साबळे, ‘स्थागुशा’चे पाेनि घाडगे यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक पार पडली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी गावात अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना केली. एवढेच नाही तर ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्याचा सल्लाही दिली. याबाबतही काहींनी नाराजी व्यक्त केली. चाेरांच्या मुसक्या आवळण्यासाठी ठाेस प्रयत्न हाेणे अपेक्षित आहे. परंतु, तसे हाेत नसल्याचे बाेलून दाखविले.