परंडा शहरातील कासीमबाग भागात राहणाऱ्या सुरेश सर्जेराव घाडगे यांच्या घरी जबरी चोरीचा प्रकार रविवारी पहाटे घडला होता. घाडगे यांच्या घराच्या जिन्यावरून चार चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यानंतर सुरेश घाडगे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना चाकूचा धाक दाखवीत सुमारे ६२ ग्रॅम सोन्याचे दागिने, स्मार्टफोन, रोख ६ हजार ८४० रुपये पळवून नेले होते. याप्रकरणी रविवारीच परंडा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर गुन्हे शाखेने वेगाने आरोपींचा तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक पांडुरंग माने, कर्मचारी काझी, हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, टेळे, आरसेवाड, अविनाश मरलापल्ले यांच्या पथकाने गोपनीय माहिती काढण्यास सुरुवात केली. अवघ्या काळी तासांतच त्यांना चोरट्यांची टीप मिळाली. त्याआधारे या पथकाने परंडा येथील रुई रोड भागात राहणाऱ्या येवरड्या चितरंग्या पवार यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केला असता घटनेत तो सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून मग पोलिसांनी चोरीस गेलेले सोन्याचे दागिने रोकड जप्त करुन पुढील तपासासाठी परंडा पोलिसांच्या हवाली केले आहे.
शस्राच्या धाकाने लूट; संशयित ३६ तासांत गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:49 AM