उस्मानाबाद : लातूरचा सत्तारमियाँ... वय वर्षे ५५... दोनवेळा शिक्षा भोगून आलेला... तरीही घरफोड्यांचा नाद काही सुटेना.नातवंडं खेळवायच्या वयात प्रेयसीसाठी दुसऱ्यांच्या घरात घुसून चोऱ्या करणाऱ्या सत्तारने उस्मानाबाद जिल्ह्यात तब्बल ८ गुन्हे केले. स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने त्यास पकडून सोने-चांदी अन् रोकड जप्त केली आहे.
पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी या गुन्ह्याबाबतचा तपशील समोर आणला. लातूरच्या लालबहादूर शास्त्री नगरात राहणारा सत्तार बाबुमियाँ सय्यद हा लातूर, उस्मानाबाद तसेच सोलापूर जिल्ह्यात गुन्हे करीत होता. यापूर्वी त्याला घरफोड्यांच्या प्रकरणामध्ये सोलापूर आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी २ वर्षांची शिक्षा झाली आहे. ही शिक्षा भोगून आला की तो लगेच पुन्हा दुसरे गुन्हे करीत होता. यावेळी त्याने आपला मोर्चा उस्मानाबाद जिल्ह्याकडे वळविला. मागील वर्षभरात त्याने शहर, आनंदनगर, कळंब, बेंबळी, उमरगा, आंबी, परंडा ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ८ घरफोड्या केल्या. त्याची मोडस ऑपरेंडी म्हणजे तो हे सगळे गुन्हे दिवसाच करीत होता. दिवसाढवळ्या घडणाऱ्या चोऱ्यांमुळे पोलीसही हैराण झाले होते. अखेर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक पांडुरंग माने, कर्मचारी महेश घुगे, हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, अविनाश मरलापल्ले, अमोल कावरे यांनी गोपनीय माहिती मिळवीत सत्तारचा छडा लावला. त्याला लातुरातून ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने ८ घरफोड्यांची कबुली दिली. यापैकी ६ गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. उर्वरित २ गुन्ह्यातील मुद्देमालाचा तपास सुरु असल्याचे अधीक्षक राजतिलक रौशन यांनी सांगितले. या कामगिरीबद्दल त्यांनी गुन्हे शाखेच्या पथकाची पाठ थोपटली.
८० ग्रॅम सोने, ४० ग्रॅम चांदी...आरोपी सत्तारने चोरी केलेल्या मुद्देमालापैकी ८० ग्रॅम सोने व ४० ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच ४१ हजाराची रोकडही ताब्यात घेण्यात आली आहे. सत्तारला पत्नीसह ६ मुले व १ मुलगी असे मोठे कुटूंब आहे. ते सर्वजण प्रामाणिकपणे आपापले काम करुन पोट भरतात. मात्र, सत्तार हा एका दुसऱ्या महिलेच्या नादी लागला. दोघांच्या उदरनिर्वाहासाठी त्याने चोऱ्या करण्याचा मार्ग दोनवेळा जेलवारी होऊनही सोडला नाही.