वाशी (जि. उस्मानाबाद) : तालुक्यातील पारा येथील एका महिलेस मारहाण करीत चोरट्यांनी दोन घरे फोडून सुमारे २ लाख १६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
पारा येथील कल्याण माधवराव भराटे हे पत्नीसह पारा येथे राहतात़ त्यांची मुले नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असतात. मंगळवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास गावातील चंद्रकांत स्वामी यांच्या घरासमोर बोअर घेण्याचे काम सुरू होते. हा बोअर पाहण्यासाठी भराटे गेले होते. हीच संधी साधत अज्ञात दोन ते तीन चोरट्यांनी झोपेत असलेल्या भराटे यांच्या पत्नीच्या गळ्यातील दागिने ओरबडण्याचा पयत्न केला. यावेळी त्या जाग्या झाल्या असता, चोरट्यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
तसेच घरातील कपडे, सोन्याचे दागिने मिळून ९१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. यानंतर चोरट्यांनी गावातीलच राजेंद्र पांडुरंग शेळके यांच्या घराकडे मोर्चा वळवला. घर फोडून रोख १५ हजार रूपये व ९५ हजार रूपये किंमतीचे दागिने लंपास केले. दरम्यान, कल्याण भराटे यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलीस निरीक्षक सतिश चव्हाण यांनी घटनास्थळास भेट तपास सुरू केला आहे.