उमरगा : येथील रोटरी क्लबच्या वतीने रोटरी फळबिया बँक योजनेंतर्गत संकलित केलेल्या फळांच्या बियांचे माती आणि गव्हाचे पीठ यांच्या मिश्रणाने दोन हजार सीड बॉल तयार केले आहेत.
प्रत्येक कुटुंबाने सेवन केलेल्या फळांच्या सर्व बिया जतन करून ठेवाव्यात. त्या स्वच्छ करून वाळवून आमच्याकडे ‘रोटरी फळ बिया बँक’ या योजनेंतर्गत जमा कराव्यात, असे आवाहन रोटरी क्लबच्या वतीने करण्यात आले होते. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पाच हजारांहून अधिक बिया जमा झाल्या.
पावसाळ्यापूर्वी या सर्व बिया आपल्या परिसरामध्ये पसरून फळझाडांची नैसर्गिक रोपण होण्यास मदत होईल, असे रोटरी क्लबच्या अध्यक्षा कविता अस्वले यांनी सांगितले. या उपक्रमासाठी अनिल श्रीमेवार, मुन्ना पाटील, पप्पू स्वामी, संजीव कुलकर्णी, अमर परळकर, उमेश चिचोळे तसेच राजे शिवाजी रोटरॅक्ट क्लब, जिजाऊ रोटरॅक्ट क्लब, वॉरियर इंटरॅक्ट क्लब, माउली आश्रमशाळा आदी क्लब यांनी पुढाकार घेतला आहे.
चौकट......
येथून झाली सुरुवात
सीड बॉल तयार करण्याच्या या उपक्रमाची सुरुवात कोरेगाववाडी येथील माउली आश्रमशाळेत व मुन्ना पाटील यांच्या फार्महाऊसवर करण्यात आली. यावेळी क्लबचे ट्रेनर डॉ. संजय अस्वले, संचालक डॉ. नीलेश महामुनी, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. विनोद देवरकर यांनी सीड बॉल कसे तयार करावे, याचे प्रशिक्षण दिले.
पहिल्याच दिवशी आंबा, सीताफळ, जांभूळ, पेरू, चिकू, खजूर आदी बियांचे जवळपास दोन हजार सीड बॉल तयार करण्यात आले. हे सर्व सीड बॉल अचलबेट माळरानावर, महामार्ग आणि नाला बंधारा येथे टाकण्यात येणार असल्याचे सचिव अनिल मदनसुरे यांनी सांगितले.