उमरगा : कृषी वीज बिल धोरण २०२० नुसार शेती पंपाचे वीज बिल भरण्यासाठी उमरगा तालुक्यातील १४ हजार ६६२ पात्र आहेत. यापैकी ५२५ शेतकऱ्यांनी ७६ लाख ७६ हजार रुपये भरुन या योजनेचा लाभ घेतला आहे. तालुक्यातील १४ हजार १३७ शेतकऱ्यांनी १०२ कोटी रुपये भरणा केल्यास त्यांचे ६५ कोटी ५० लाख रुपयाचे वीज बिल व व्याज माफ होणार आहे.
सध्या महावितरणकडून वीज बिलाच्या वसुलीसाठी जोरदार मोहीम राबविली जात आहे. यात शेती पंपाच्या थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी थेट रोहित्रावरून वीज पुरवठा खंडित केला जात आहे. शिवाय, शेतकऱ्यांनी थकीत वीज बिल भरावे, यासाठी सवलत योजना देखील सुरू करण्यात आली आहे. यामध्ये सप्टेंबर २०२० पर्यंतचा विलंब आकार व सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज माफ होणार आहे. याशिवाय, उर्वरित थकबाकीच्या ५० टक्के रक्कम देखील माफ होणार आहे. या योजनेसाठी उमरगा तालुक्यातील १४ हजार ६६२ शेतकरी पात्र आहेत. त्यांच्याकडे एकूण १६९ कोटी रुपयाची थकबाकी आहे. त्यांनी या योजनेतून १०३ कोटी रुपये भरणा केल्यास ६६ कोटी रुपये माफ होणार आहेत. आजपर्यंत तालुक्यातील ५२५ शेतकऱ्यांनी ७६ लाख ७६ हजार रुपये भरुन या योजनेचा लाभ घेतला आहे. यामुळे त्यांचे ५० लाख रुपये माफ झाले आहेत. अद्याप तालुक्यातील १४ हजार १३७ शेतकऱ्यांनी १०२ कोटी रुपये भरणा केल्यास त्यांचे ६५ कोटी ५० लाख रुपयाचे वीज बिल व व्याज माफ होणार आहे.
कोट......
कृषी वीज बिल धोरण २०२० ही सवलत योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेत सहभाग नोंदवावा. विलंब आकार, व्याज व थकबाकीतील माफीचा लाभ घेऊन उर्वरित रक्कम भरणा करावी.
- राजेंद्र शेंडेकर, उपकार्यकारी अभियंता, उमरगा