कळंब : खोडसाळ फोन कॉलवर कार्यवाहीसाठी तत्परतेने धावलेल्या येथील महसूल विभागातील अधिकाऱ्यांना मंगळवारी कार्यवाही न करताच रिकाम्या हाताने परतावे लागले. ही कार्यवाही गुपचूप केली असती तर कानोकान खबर लागली नसती. परंतु, त्याचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने कशासाठी केला होता अट्टाहास? असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे.
साहेब दुकानात तुफान गर्दी आहे... तुम्ही लगेच धाड टाका... मोठा व्यापारी आहे... असा फोन मंगळवारी महसूल विभागात धडकला. यावरून अधिकारी तातडीने त्या दुकानाकडे गेले. त्यांनी दुकानात जाऊन साफसफाई करण्यासाठी दुकानात जाण्याच्या तयारीत असणाऱ्या नोकराला ‘शटर उघड अन्यथा सील करतो’, असे बजावले. त्यामुळे नोकराने घाबरून दुकान उघडले. यानंतर अधिकाऱ्यांनी दुकानातून प्रवेश केला. यावेळी काही खाजगी व्यक्ती देखील त्यांच्या पाठोपाठ दुकानात शिरून उत्साहाने शुटींग करीत होत्या. यावेळी दुकानात तो व्यापारी व दुकानाची पाहणी करायला आलेल्या दोन नोकरशिवाय कोणीच आढळले नाही. त्यामुळे काही अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या कॉलवर ‘तगडी’ कार्यवाही करण्यासाठी आलेल्या महसूलच्या अधिकाऱ्यांना या फेक कॉलमूळे आज टिकेला तोंड द्यावे लागले. सध्या कोविड सेंटर फुल्ल आहेत. लसीकरणकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत एखादा खोडसाळ फोन कॉल कळंबच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करण्यासाठी गांभीर्याने घेतला कसा? असा प्रश्नही आता व्यापाऱ्यांतून उपस्थित केला जातो आहे.
चौकट -
कायदेशीर कार्यवाही करणार
दुकान बंद असले तरी अनेक विद्युत उपकरणे चालू असतात. माणसांचा वावर नसला तर उंदरांचे प्रमाण वाढते. त्याची पाहणी करण्यासाठी आम्ही लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आज आलो होतो. विद्युत व्यवस्था सोलरवर असल्याने दुकानातील दिवे चालू असतात. काही खोडसाळ मंडळींनी दुकानात ग्राहक आहेत, गर्दी आहे अशी माहिती देऊन प्रशासनाला फोन केला. त्याची खातरजमा करण्यासाठी अधिकारी आले, त्यावर आक्षेप नाही. पण, सोबत खाजगी लोकांना घेऊन आले, व्हीडीओ काढला हे आक्षेप घेण्यासारखे आहे. हा प्रकार मुद्दामहुन घडवून आणल्याचा संशय असून त्या सर्वांवर कायदेशीर कार्यवाही करू, असा इशाराही त्या व्यापाऱ्यांनी दिला.
चौकट -
माहिती मिळाल्याने पाहणी
संबंधित दुकानात ग्राहक असल्याची माहिती काही मंडळींनी आमच्या अधिकाऱ्यांना दिली. त्याच्या पाहणीसाठी, खातरजमा करण्यासाठी ते गेले होते. तेथे कोणी ग्राहक आढळले नाही. त्यामुळे संबंधित व्यापाऱ्यांवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, अशी माहिती उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी दिली.