उस्मानाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने लसीकरण मोहिमेवर जोर दिला आहे. शहरी भागात लसीकरण मोहिमेस प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही महाभागांनी मृत्यू होतो, तर काहींनी अपत्य होत नाही, अशी खुळचट अफवा पसरवली. ते शंभर टक्के चूक असून, आरोग्य विभागाला हे समजावून सांगण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गास आळा बसावा, यासाठी शासन स्तरावरून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. १६ जानेवारीपासून लसीकरणास प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात आली होती. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस टोचली जात आहे. मागील दोन महिन्यांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सजग नागरिक लस घेण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, असे असतानाच काही महाभाग लस घेतल्यानंतर दोन वर्षांत मृत्यू ओढवतो, तर काहींनी अपत्य होत नाही, अशी खुळचट अफवा पसरविली आहे, तर काहींनी समाजमाध्यमाद्वारे अशा अफवांना हवा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अनेक नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत संभ्रमावस्था निर्माण होत आहे. ही अफवा शंभर टक्के चूक असून, आरोग्य विभागाला हे समजावून सांगण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
काय आहेत अफवा...
अशी आहे पहिली अफवा
लस घेतल्यानंतर माणूस आजारी पडतो, अशक्तपणा येतो. कोविशिल्ड लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखी, मळमळ, तोंड येणे असे आजार होत आहेत.
अशी आहे दुसरी अफवा
निरोगी असलेल्या व्यक्तीने लस घेतली तर लस घेतल्यानंतर त्या व्यक्तीचा पंधरा दिवसांनी मृत्यू हाेत आहे. तसेच लस घेतल्यानंतर दोन वर्षांच्या आत माणसाचा मृत्यू होताे.
अशी आहे तिसरी अफवा
लस घेतल्यानंतर त्याचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होताे. महिलांनी लस घेतल्यानंतर मुले होत नाहीत. अशा अफवाही ग्रामीण भागात काही ठिकाणी पसरविल्या आहेत.
प्रतिक्रिया..
लस न घेतलेल्या व्यक्तींमध्ये कोरोना प्रतिबंधित लस घेण्यासाठी अद्यापही समज - गैरसमज आहेत. लस घेतल्यानंतर माणूस आजारी पडत आहे. ताप येणे, कणकण येणे, उलटी, डोकेदुखी, छातीत वेदना याचा त्रास होत आहे. त्यामुळे लस घ्यावी की नाही, घेतल्यानंतर काय परिणाम होईल, याची मनात शंका आहे. त्यामुळे मी अद्यापर्यंत लस घेतली नाही.
अनिल गुरव, केसरजवळगा
कोट...
लसीकरणाबाबत ग्रामीण भागात मागील काही दिवसांपूर्वी आजारी पडण्याची अफवा होती. तसेच समाजमाध्यमांद्वारे अफवा पसरविल्या जात असतात. लसीचा मानवी शरीरावर दुष्परिणाम होत नसून, लस उपयुक्त आहे. लसीबाबत ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्तीमार्फत जनजागृती केली जात आहे.
डॉ. कुलदीप मिटकरी, जिल्हा लसीकरण अधिकारी