उस्मानाबाद : जिल्ह्यात रुग्ण वाढीस लागल्याने ऑक्सिजनचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यातून सोमवारी उस्मानाबाद शहरातील एका खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपत आला होता. प्रसंगावधान राखून जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधल्याने वेळीच ऑक्सिजनची उपलब्धता झाली. तसेच काही गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात शिफ्ट केल्याने पुढची हानी टळली.
एकिकडे रुग्णांचा आकडा भरमसाठ वाढत चालला आहे. त्यात शासकीय आयोग्य यंत्रणेकडे अपुरे मनुष्यबळ आहे. त्यातही मेहनतीने गाडा ओढला जात आहे. खाजगी रुग्णालयांचीही काही परिस्थिती वेगळी नाही. सधन रुग्णांचा खाजगीकडे ओढा आहे. मात्र, बेडची मर्यादा असल्याने येथेही ताण प्रचंड वाढला आहे. दुसरीकडे ऑक्सिजनचाही वापर वाढल्याने पुरवठ्यावर ताण पडत चालला आहे. यातूनच सोमवारी सकाळी उस्मानाबादेतील एका खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपत आला होता. स्टॉक नसल्याने प्रसंगावधान राखून रुग्णालय प्रशासनाने वेळीच जिल्हा रुग्णालयातील समन्वय अधिकारी डॉ.इक्बाल मुल्ला यांच्याशी संपर्क केला. त्यांनी तातडीने खाजगी रुग्णालयातील व्हेंटिलेटर, आयसीयु व ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची माहिती घेतली. ५ सिलेंडर लागलीच या रुग्णालयाकडे रवाना केले. शिवाय, गंभीर रुग्णांची ऐनवेळी अडचण होऊ नये, याकरिता त्यांना तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा रुग्णालयात शिफ्ट करण्याचे काम हाती घेतले. जिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात वेळीच झालेल्या संवादाने संभाव्य हानी टाळता आली. एकिकडे अशा गंभीर स्थितीत विसंवादाची उदाहरणेही कानी येत असताना या प्रसंगाने मात्र, एक सकारात्मकता निर्माण केली आहे.
सकाळी रुग्णालय प्रशासनाचा ऑक्सिजन स्थितीबाबत फोन आला होता. यानंतर संपूर्ण माहिती तातडीने घेत पहिल्यांदा तेथे जिल्हा रुग्णालयाकडे उपलब्ध असलेले ५ ऑक्सिजन सिलेंडर रवाना केले. तसेच गंभीर असलेल्या रुग्णांची अडचण होऊ नये याकरिता त्यांना जिल्हा रुग्णालयात शिफ्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले. आपला लढा कोरोनाशी आहे. खाजगी असो वा सरकारी, कोणताही भेद न करता सर्वांनीच संवाद ठेवल्यास हा लढा आपण जिंकू शकू.- डॉ.इक्बाल मुल्ला, समन्वय अधिकारी, जिल्हा रुग्णालय