उस्मानाबाद : ऑक्सिजन मिळवण्यासाठी सगळ्याच बाजूने धडपड सुरू असताना जिल्ह्यातील उद्योगांनी मदतीचा हात पुढे केला आहे. धाराशिव कारखान्याने राज्यातील पहिलाच पायलट प्रोजेक्ट राबवून तो दृष्टिपथात आणलेला असतानाच आता रूपामाता उद्योग समूहानेही पुढाकार घेत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातही ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. परिणामी, रुग्णालये व ऑक्सिजन पुरवठादारावर मोठा ताण येत आहे. आजघडीला पुणे, चाकण, कर्नाटकातील बेल्लारी येथून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. सध्या १६ टनांपेक्षाही जास्त मागणी ऑक्सिजनची आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन सर्वात आधी धाराशिव कारखान्याने राज्यातील पहिलाच पायलट प्रोजेक्ट म्हणून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची उभारणी केली. काही दिवसांतच येथे प्रत्यक्ष ऑक्सिजन उत्पादनास सुरुवात होत आहे. यानंतर सध्याची गरज भागविण्यात अडचणी येणार नाहीत. असे असले तरी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तेव्हा पुन्हा ऑक्सिजनची मागणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता या ऑक्सिजन लढ्यात योगदान देण्यासाठी पाडोळी येथील रूपामाता उद्योग समूहाने पुढाकार घेतला आहे. लवकरच या प्रकल्पाच्या उभारणीस सुरुवात होणार असून, जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचे दिशेने पावले पडण्यास चांगली सुरुवात झाली आहे.
५० लाखांची गुंतवणूक...
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीसाठी रूपामाता समूहाने संबंधित साहित्य पुरवठादाराशी संपर्क साधला आहे. बोलणी झाल्यानंतर तातडीने साहित्याची ऑर्डर देऊन ॲडव्हान्समध्ये बिलही अदा केले आहे. त्यामुळे लवकरच हे साहित्य कारखाना साइटवर पोहोचून मेअखेरीस कामाला सुरुवात होऊ शकेल. या प्रकल्पातून दररोज १०० सिलिंडर्स ऑक्सिजनचे उत्पादन होऊ शकेल, अशी माहिती चेअरमन ॲड. व्यंकटराव गुंड यांनी दिली.