कळंब : लॉकडाऊन काळापासून विस्कटलेली एसटी महामंडळाची आर्थिक घडी अनलॉकच्या पर्वातही सावरलेली दिसून येत नाही. यात लालपरीच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची अलीकडे पगार तर वेळेवर होत नाहीच, शिवाय आरोग्यविषयक संकटाचा स्पर्श झालेल्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिलांची महिनोंनमहिने परिपूर्ती होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
प्रवासी वाहतुकीत हुकमी एक्का असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास वैभवशाली इतिहास आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक महिने एसटीच्या लालपरीची चाके ‘लॉकडाऊन’ झाल्याने आर्थिक डोलारा डळमळीत झाला आहे. यानंतर जनजीवन सुरळीत होऊन लालपरी रस्त्यावर धावत असली तरी महामंडळाचे अर्थकारण मात्र मार्गी लागल्याचे दिसून येत नाही. याचाच मोठा फटका एसटीच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. कार्यरत वाहक, चालक, आस्थापना व कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तर नस्तीबंद झाले आहेत. शिवाय नित्यनियमाने होणारे मासिक वेतनही विलंबाने होत आहे. पगार तर सोडाच ! मागच्या दीड वर्षात कळंब आगारातील अनेक कर्मचाऱ्यांची वैद्यकीय परिपूर्ततेची देयकेदेखील लालफीतशाहीत अडकली असल्याने याचा त्रास सहन करावा लागणारे कर्मचारी संताप व्यक्त करत आहेत.
पगाराच्या वेळापत्रकात बिघाड...
सध्या एसटी बस आपल्या नियमित, निर्धारित ‘शेड्यूल’प्रमाणे रस्त्यावर धावत असली तरी या बसची ‘स्टेअरिंग’ हाती असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे ‘वेळापत्रक’ मात्र कोलमडल्याचे चित्र आहे. पगाराची तारीख पुढे सरकत आहे. जुलैचा ३ सप्टेंबरला तर ऑगस्टचा पगार ७ सप्टेंबरला हाती पडला आहे. निधीच्या तुडवड्यामुळे हे घडत आहे.
महिनोंन् महिने वैद्यकीय बिलाची परिपूर्ती होईना
आगारातील अनेक कर्मचाऱ्यांना मागच्या दोन वर्षात आरोग्यविषयक संकटाला तोंड द्यावे लागले. यासंबंधीच्या हक्काच्या वैद्यकीय देयकांचा ‘प्रवास’ व्हाया आगार, विभागीय कार्यालयाकडे ‘मार्गस्थ’ होतो. देयकांचा हा प्रवासही सध्या खडतर ठरत असून पन्नासावर देयके लटकल्याने वेळेवर परिपूर्ती होत नसल्याने समोर आले आहे.
प्रतिक्रिया
माझ्यावर आरोग्यविषयक संकट ओढवले. यानंतर ५७ हजारांचे वैद्यकीय बिल दाखल केले. मात्र, यास अनेक महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप मंजुरी व रक्कम मिळालेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही काही उपयोग होत नाही.
- डी. एम. काळे, चालक. कळंब आगार
मला पॅरॅलिसिसचा त्रास जाणवला. अशा संकटात काम करत असताना दोन वेळा वैद्यकीय बिल वेळेत सादर केले. मात्र, एकदाही मिळाले नाही. अकारण माघारी करत वेळ घालवला जातो. आरोग्यविषयक व आर्थिक संकटात असताना वैद्यकीय देयकांची परिपूर्ती मिळाली नाही. माझ्यासारखे असे अनेक कर्मचारी आहेत.
- एम. एम. वायकुळे, वाहन परीक्षक, कळंब आगार
कळंब आगार
चालक २०२
वाहक १८५
प्रशासकीय ३६
कार्यशाळा ६४
कळंब आगारातील कर्मचाऱ्यांचा दर महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या आत पगार केला जातो. मध्यंतरी एकदा विलंब झाला होता. वैद्यकीय देयके आम्ही विभागीय कार्यालयाकडे सादर करतो. यावर पुढील कार्यवाही तेथे होते. सध्या आमच्यास्तरावर कोणाचाही प्रस्ताव प्रलंबित नाही.
- मुकेश कोमटवार, आगार व्यवस्थापक, कळंब