उस्मानाबाद : समाज सुधारणेच्या चळवळीत, कार्यात सक्रिय सहभागी असणाऱ्या विचारवंतांचे देशात खून होत आहेत. डॉ.दाभोलकर यांच्यासह इतरही तिघांचे गोळ्या झाडून खून झाले. या चारही खुनामध्ये एकसमान धागा दिसून येत आहे. इतक्या वर्षांनंतरही त्यांचे मारेकरी सापडले नाहीत. त्यामुळे विशेष पथकाद्वारे तपास होऊन सूत्रधारांना अटक व्हावी, अशी अपेक्षा शुक्रवारी अंनिसच्यावतीने व्यक्त करण्यात आली.
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्यापाठोपाठ कॉ.गोविंद पानसरे, माजी कुलगुरु एम.एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांचेही गोळ्या झाडून खून झाले आहेत. समाज सुधारणेच्या कार्याला वाहून घेतलेल्या या विचारवंतांचा असा खून होणे, ही गंभीर बाब आहे. आज या घटनेला इतकी वर्षे उलटून गेली तरी सूत्रधारांचा पत्ता लागत नाही. गौरी लंकेश यांच्या खुनाचा तपास करताना एसआयटीला चारही खुनामध्ये एकसमान धागा आढळून आला आहे. यामध्ये धार्मिक मूलतत्त्ववादी सहभागी आहेत, अशी दाट शंका आहे. त्यांना पकडण्यात उशीर होत आहे. तपासात निर्णायक गती यावी, यासाठी विशेष तपास पथक गठित करण्यात यावे, अशी मागणी अंनिसच्यावतीने करण्यात आली आहे. शिवाय, सामाजिक कार्यकर्त्यांचे खून थांबविण्यासाठी एका कडक कायद्याची तातडीने निर्मिती करण्यात यावी, चारही केसेसमध्ये निष्णात वकील नियुक्त करावेत, धार्मिक मूलतत्त्ववादी व्यक्ती, संघटनांवर बंदी घालावी, अशा मागण्याही जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना दिलेल्या निवेदनातून केल्या आहेत. यावेळी ॲड.वामन पांडगळे, ॲड.अजय वाघाळे, सिद्धेश्वर बेलुरे, अब्दुल लतीफ अब्दुल मजीद, विजय गायकवाड, शंकर खुने, गणेश वाघमारे आदी उपस्थित होते.