लोहारा : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली असून, आता सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम तहसीलदारांनी जाहीर केला आहे. यानुसार ८ व ११ फेब्रुवारीला या निवडी होणार आहेत.
तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी आरणी, मार्डी, धानुरी, तावशीगड व राजेगाव या ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या होत्या. त्यामुळे एकूण २१ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका पार पडल्या. त्यानंतर तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले. यानंतर ज्या ग्रामपंचायतमध्ये काठावर बहुमत आहे, तिथे सदस्यांना साभाळताना पॅनेलप्रमुखांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आता या २६ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम तहसिलदार संतोष रुईकर यांनी जाहीर करुन अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार ८ फेब्रुवारी रोजी तावशीगड, भोसगा, आरणी, आष्टाकासार, धानुरी, करजगाव, भातागळी, कानेगाव, करवंजी, लोहारा (खु), एकोंडी(लो), उदतपुर या गावच्या निवडीचा कार्यक्रम होणार आहे. तर ११ फेब्रुवारी रोजी चिंचोली(काटे), कास्ती (खुर्द), कोंडजीगड, मोघा(बु), दस्तापुर, हिप्परगा (सय्यद), कास्ती(बु), होळी, हराळी, फनेपुर, राजेगाव, मुर्शदपूर, बेलवाडी,मार्डी या ग्रामपंचायतीच्या निवडी होणार आहेत.