लोहारा : तालुक्यातील उडरगांव येथील सरपंचपद रिक्त असून, त्यातच आता उपसरपंचानी राजीनामा देऊन दोन महिने लोटले तरी नवीन उपसरपंच निवडीचा कार्यक्रमच जाहीर न झाल्याने गावातील विकास कामाला ब्रेक लागला आहे. यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
लोहारा तालुक्यातील उंडरगाव हे दोन हजार लोकसंख्येचे गाव. येथे प्रत्येक निवडणुकीत वाद ठरलेला. त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी बैठकावर बैठका झाल्या. यात सरपंचपद जनतेतून असल्याने सुरूवातीला सरपंचपदासाठी मल्लीनाथ पांचाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर सात सदस्य निवडीसाठी बैठका झाल्या. यात सात पैकी चार सदस्य बिनविरोध काढण्यात आले. परंतु, उर्वरित तीन सदस्यासाठी शेवटपर्यत एकमत न झाल्याने तीन जागेसाठी निवडणूक लागली. त्यानंतर उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर होनू या पदावर मुरलीधर मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दरम्यान, सरपंच, उपसरपंच गावचा गाढा चालवत असतानाच सरपंच मल्लिनाथ पांचाळ यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले असल्याने त्यांचे सरपंचपद रद्द करण्याची तक्रार केली गेली. यामुळे पांचाळ यांचे सरपंचपद रद्द झाले. परिणामी ग्रामपंचायतचा सर्वच कारभार हा उपसरपंच मुरलीधर मोरे यांच्याकडे आला. यानंतर उपसरपंचपद हे आडीच आडीच वर्षासाठी ठरल्याने मोरे यांनी २३ डिसेंबर २०२० मध्ये पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांच्याकडे उपसरपंचपदाचा राजीनामा दिला. याला आता दोन महीने लोटली तरी अजून नवीन उपसरपंच निवडीचा कार्यक्रमच जाहीर झाला नाही. त्यामुळे गावातील विविध विकास कामे तर थांबली आहेतच, शिवाय ग्रामस्थांना कागदपत्रे देण्यात तसेच गावच्या पाणी पुरवठ्यातही अडचणी येत आहेत.
कोट........
अगोदरच येथील सरपंचपद रिक्त सून, त्यातच उपसरपंचांनी राजीनामा दिल्यामुळे मुलभूत सोयी-सुविधा मिळणे कठीण झाले आहे. जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन पुढील कार्यवाही करावी.
- महेश ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य
सध्या गावाला सरपंच व उपसरपंच नाही. त्यामुळे दोन वर्षापासून गावचा विकास थांबला आहे. तसेच ग्रामस्थांना विविध प्रमाणपत्रासाठी अडचणीला समोरे जावे लागत आहे.
- दादासाहेब रवळे, नागरिक