आठ-अ उताराही हाेणार उपलब्ध -महसूल विभागासमवेत सामंजस्य करार
उस्मानाबाद - जिल्हा बॅंक आर्थिक अडचणीत आहे. या बॅंकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी संचालक मंडळाच्या निर्णयानुसार राज्य शासनाच्या महसूल विभागाशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार आता जिल्हा बॅंकेच्या सर्वच शाखांमधून आता शेतकऱ्यांना सातबारा, आठ-अ उतारा तसे घरांचे आवश्यक दाखले ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
सातबारा, आठ-अ उतारा काढायचा म्हटले की शेतकऱ्यांना तलाठी कार्यालय गाठावे लागत असे. अशावेळी सदरील कार्यालय बंद असल्यास शेतकऱ्यांन माेठी बाजारपेठ असलेले गाव व तालुक्याच्या ठिकाणी जाऊन सुविधा केंद्र गाठवे लागत असे. अशावेळी शेतकऱ्यांचा पैसे आणि वेळही माेठ्या प्रमाणात खर्ची पडत असे. हीच अडचण लक्षात घेऊन जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाने बॅंकेच्या सर्व शाखांतून सातबारा, आठ-अ उतारे तसेच घरासंबंधी आवश्यक दाखल देण्याचा निर्णय घेतला हाेता. यानंतर आवश्यक ती प्राेसेस करून राज्य शासनाच्या महसूल विभागासाेबत सामंजस्य करार केला. या उपक्रमाचा शुभारंभ २८ जून राेजी करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात पाच शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा वितरित केला. यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, उपाध्यक्ष कैलास शिंदे, संचालक संजय देशमुख, ज्ञानेश्वर पाटील, नागप्पा पाटील, सतीश दंडानाईक, सुग्रीव काेकाटे, विकास बारकुल, त्रिंबक कचरे, बॅंकेचे कार्यकारी संचालक विजय घाेणसे पाटील आदी उपस्थित हेाते.