उस्मानाबाद : गेल्या दीड वर्षापासून शाळा कुलूपबंद असल्याने, त्यावर आधारित अर्थचक्रही थंडावले आहे. सर्वाधिक फटका स्कूल बस व्यावसायिकांना बसला आहे. बसची चाके थंडावल्याने स्कूल बस मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत, तर चालकांनी जगण्याचे अन्य मार्ग पत्करले आहेत.
जिल्ह्यात सुमारे १५० स्कूल बस धावतात. त्यावर काम करणारे सुमारे १०० चालक एका फटक्यात बेरोजगार झाले आहेत. दीड वर्षापासून बस एकाच जागी थांबून आहेत. सुरुवातीचे काही महिने मालकांनी अर्धा पगार देऊन चालकांच्या उदनिर्वाहाची व्यवस्था केली; पण लाॅकडाऊन लांबतच गेल्याने हा मार्गही थांबला. बस मालकांना बॅंकेचे हप्ते, आरटीओचे कर आदी खर्च वाढल्याने चालकांचे वेतन थांबले. कोरोना काळात रुग्णवाहिकांची चलती असल्याने, अनेकांनी त्यावर चालक म्हणून काम स्वीकारले. काहींनी मालवाहतूक वाहनांवर काम करण्याचा पर्याय निवडला आहे, तर काही चालक भाजीपाला विक्री करीत आहेत. त्यातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत, तर अनेक जण बांधकाम मजूर म्हणून काम करत आहेत.
गाडीवरील कर्ज कसे फेडणार
माझ्याकडे दोन स्कूल बस आहेत. १९ महिन्यांपासून बंद आहेत. शासनाकडे जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक, तसेच मालवाहतुकीसाठी परवानगी मागितली होती. मात्र, परवानगी मिळालेली नाही. गाड्या जाग्यावरच थांबून असल्याने सुरू करता, इन्शुरन्स, आरटीओ कर भरायचा आहे, तसेच टायर बदलावे लागणार आहेत. यासाठी १ लाख रुपये खर्च येईल.
दादा गवळी
दीड वर्षापासून स्कूल बस जाग्यावर उभी आहे. गाडी घेण्यासाठी पतसंस्थेकडून कर्ज काढले होते. पतसंस्थेचे हप्ते थकीत आहेत. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेतात सोयाबीन कोळपणीने काम करीत आहे. यातून ५०० रुपये रोजगार मिळत आहे.
गोपाळ शिंदे
चालकांचे हाल वेगळेच
स्कूल बसवर चालक म्हणून काम करत होतो. त्यातून महिन्याला १३ हजार रुपये पगार मिळायचा. शाळा बंद असल्याने स्कूल बस बंद आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्या मालवाहतूक टेम्पोवर चालक म्हणून काम करत असून, महिन्याकाठी ७ हजार रुपये मिळत आहेत.
प्रवीण कांबळे
स्कूल बसवर चालक म्हणून काम करीत असल्याने, १२ ते १५ हजार रुपये पगार मिळत होता. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. स्कूल बस बंद झाल्याने हाताला काम नव्हते. आता पंक्चरचे दुकान टाकले आहे. यातून दिवसाकाठी २०० ते ३०० रुपये रोजगार मिळत आहे.
बापू गायके
असा होतोय स्कूल बसचा वापर
१ गाड्या दीड वर्षापासून घरासमोर उभ्या आहेत. एकाच जागी गाडी बंद असल्याने गाड्याचे टायरची झीज होत आहे.
२ गाडीचा इतर कामासाठी वापर करण्यास परवानगी नसल्याने दीड वर्षापासून गाडी गेटमध्ये अशी उभी केलेली आहे.
३ भाजीपाला विक्री, तसेच मालवाहतुकीसाठी परवानगी नसल्याने गाडी घरासमोरच उभी आहे. गाडी सुरू केल्यानंतर गाडीची दुरुस्ती करावी लागू शकते.