धाराशिव : शालेय पोषण आहार कामगारांना हरियाना, तमिळनाडूच्या धरतीवर प्रति महिना १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे, या मागणीसाठी शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हा कचेरीसमोर आंदोलन करण्यात आले.
शालेय पोषण आहार कामगारांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. पाठपुरावा करुनही मागण्या मान्य होत नसल्याने बुधवारी शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले, शालेय पोषण आहार कामगारांना पोषण आहाराव्यतिरिक्त इतरही कामे सांगितले जात आहे. अडीच हजार रुपयात कुटूंबाचा गाडा हाकणे कठीण होत आहे. कमी मानधनावर शासन कामगारांना राबवून घेत असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला.
शालेय पोषण आहार कामगारांना १८ हजार रुपयाचे मानधन देण्यात यावे, दहा महिन्याऐवजी बारा महिने मानधन देण्यात यावे, शालेय पोषण आहार कामगारांना शिपाई दर्जा द्यावा, कामगारांना कायमस्वरुपी सेवेत रुजू करुन घेण्यात यावे, अशा मागण्याही यावेळी आंदोलनकर्त्यांनी लावून धरल्या होत्या. आंदोलनात जिल्हा पोषण आहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कुसूम देशमुख, सचिव सुरेश धायगुडे, अण्णासाहेब डांगे, शितल तौर, जयश्री वरपे, अली शेख आदी सहभागी झाले होते.