बाबूराव चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : परंडा तालुक्यातील सिरसाव गावात जिल्हा परिषदेची दहावीपर्यंत शाळा आहे. या शाळेत चारशेवर विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. गावासह शिवारातील जलस्त्रोतांना खारट पाणी येत असल्याने या विद्यार्थ्यांना घरूनच पाणी आणावे लागत होते. घरून आणलेले पाणी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेलगतची घरे अथवा हॉटेलमध्ये जावून तहान भागवावी लागत असे. विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती न पाहवल्याने गावातीलच बर्फगोळे विक्रेते नवनाथ बलभीम मिसाळ यांनी स्व:खर्चातून शाळेसाठी सुमारे एक किलोमिटर अंतरावरून पाईपलाईन आणली आहे. मिसाळ यांच्या या दातृत्वामुळे आज सुमारे चारशेवर विद्यार्थ्यांची तहान भागली आहे.सिरसाव येथील साठ ते पासष्ठ वर्षीय नवनाथ मिसाळ यांची आर्थिकस्थिती बेताचीच. गावामध्ये केवळ दीड ते दोन एकर जमीन आहे. सततच्या नापिकीमुळे या जमिनीच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले. त्यामुळे मिसाळ यांनी गावामध्ये फिरून बर्फगोळे विक्रीचा छोटा व्यवसाय सुरू केला. शेती आणि बर्फगोळे विक्रीतून मिळणाऱ्या पैशावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. बर्फगोळे विक्रीच्या निमित्ताने त्यांचा सातत्याने जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वावर असतो. यामुळेच विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होणारी पायपीट त्यांच्या निर्दशनास येत असे. गावासह परिसरातील जलस्त्रोतांना खारट पाणी येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरूनच बाटली भरून आणण्याशिवाय गत्यंतर नव्हते. सोबत आणलेले पाणी संपल्यानंतर मात्र, विद्यार्थ्यांना पाण्यासाठी शाळेलगत असलेली घरे आणि हॉटेलचा आधार घ्यावा लागत असे. अशावेळी मुलींची जास्त गैरसोय होत असे. विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होणारी फरफट न पाहवल्यानेच ‘कुठल्याही परिस्थितीत शाळेसाठी पाईपलाईन करून द्यायचीच’, अशी खुनगाठ त्यांनी मनाशी बांधली. त्यानुसार बर्फगोळे विक्रीतून मिळणाऱ्या पैशातील काही रक्कम ते पाईपलाईनच्या कामासाठी राखून ठेवू लागले. शेतीच्या उत्पन्नातील थोडीबहुत रक्कमही त्यांनी पाईपलाईनसाठी ठेवली. बघता-बघता ही रक्कम अर्ध्या लाखाच्या घरात पोहोंचली. या पैशातून पाईपलाईनचे काम होवू शकते, असा अंदाज आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली. सिरसावसाठी तांदूळवाडी धरणातून पाणी योजना राबविण्यात आली आहे. ही योजना गावापासून किमान एक किलोमिटर अंतरावर आहे. या योजनेवरून कनेक्शन घेण्याचे निश्चित करून जवळपास अडीच इंच पाईपलाईन शाळेपर्यंत आणली. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना ना घरून पाणी आणावे लागतेय ना शाळा परिसरातील हॉटेल्सचा शोध घ्यावा लागतो. मिसाळ यांच्या दातृत्वामुळे विद्यार्थ्यांची पायपीट थांबण्यास मदत झाली आहे. या कार्यात त्यांना पंचायत समिती सदस्य पोपट चोबे, सरपंच संजय पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय चोबे, मुख्याध्यापक राजेंद्र मिसाळ, सहशिक्षक बालाजी पडवळ यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
बर्फगोळे विक्रीच्या पैशातून शाळेसाठी पाईपलाईन !
By admin | Published: May 08, 2017 12:17 AM