उमरगा : दहावीच्या मूल्यमापन प्रक्रियेत शाळांची ऑनलाईन गुणदान प्रक्रिया नोंद करण्याची मुदत ३ जुलैपर्यंत आहे. आता केवळ चार दिवस शिल्लक आहेत. तालुक्यातील जवळपास ९० टक्के शाळांनी हा टप्पा पूर्ण केला असला तरी दहा टक्के शाळा अद्याप बाकी आहेत. त्यामुळे अशा स्थितीत निकालास उशीर झाल्यास त्याला शाळाच जबाबदार राहणार आहेत.
यंदा दहावीच्या परीक्षा न होता निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे लागणार असून, त्याची कार्यपद्धती जाहीर झाली आहे. मात्र, निकाल तयार करत असताना रीपिटर विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड मिळवणे शिक्षकांसाठी जिकिरीचे झाले आहे. शाळा स्तरावर निकाल समिती कार्यान्वित करण्यात आली आहे. यामध्ये इयत्ता नववीच्या वार्षिक मूल्यमापनाचे अभिलेख आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या संदर्भातील सर्व अभिलेख, संबंधित उत्तरपत्रिका व इतर बाबी जमा करण्याचे किचकट काम शिक्षकांना करावे लागत आहे. हे सर्व रेकॉर्ड निकाल समितीच्या पडताळणीनंतर सीलबंद करून मुख्याध्यापकांच्या ताब्यात ठेवावे लागणार आहेत. हे अभिलेख अठरा महिने जतन करायचे आहेत. दरम्यान, आवश्यकतेनुसार क्षेत्रीय अधिकारी किंवा पथकास पडताळणीसाठी ते उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.
-----------------------------------------------------------------
दहावीच्या वर्गात २३३२ मुले व २३२६ मुली असे एकूण ४६५८ विद्यार्थी आहेत.
-----------------------------------------------------------------
९० टक्के शाळांनी पूर्ण केला टप्पा
प्रतिक्रिया.................
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा यंदा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केला जाणार आहे. यासाठी नवीन मूल्यांकन प्रणालीनुसार तो मुलगा किती वर्षापासून परीक्षा देत आहे, तेव्हापासूनचे रेकॉर्ड शाळेकडे असणे महत्त्वाचे आहे. काही शाळांना नव्याने १० वी वर्गात प्रवेश केलेल्या व रीपिटर विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड मिळण्यात थोडी अडचण आली होती. असे असले तरी आजपर्यंत तालुक्यातील ९० टक्क्यापेक्षा जास्त शाळांनी निकालाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित शाळाही येत्या दोन दिवसांत निकाल पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
- शिवकुमार बिराजदार, गटशिक्षणाधिकारी.
यावर्षी कोरोनामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्याने इयत्ता दहावीचा निकाल तयार करताना अनेक अडचणी आल्या. परंतु, मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आमच्या शाळेचा निकाल आम्ही वेळेत पूर्ण करून बोर्डाकडे दिलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन गुण भरून वेळेत पूर्ण झालेले आहेत. शाळेकडे शाळेचे व बोर्डाचे जुने रेकॉर्ड अद्ययावत असेल तरच रीपिटर मुलांचा निकाल लवकर तयार होतो. रेकॉर्ड नसेल तर हा निकाल तयार करायला विलंब होत आहे.
- पद्माकर मोरे, मुख्याध्यापक जि. प. प्रशाला, उमरगा.
यंदा इयत्ता १० वी वर्गाचा निकाल तयार करण्यासाठी जे निकष ठेवले आहेत त्या निकषांना अनुसरुन बऱ्याच शाळा थोड्या गोंधळामध्ये आहेत. ज्या शाळांकडे जुने रेकॉर्ड अद्ययावत आहे, मागच्या वर्षीचे ज्या शाळांकडे नववी वर्गाचे निकालाचे रेकॉर्ड व्यवस्थित आहे. यावर्षी त्यांना दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे फॉर्म भरताना कुठेही अडचण येत नाही, पण यामध्ये काही रीपिटर मुले, पुनर्परीक्षार्थी अशा मुलांचे फॉर्म भरण्यासाठी थोडी अडचण येत आहे.
- अजित गोबरे, मुख्याध्यापक, कै. शरणप्पा मलंग विद्यालय, उमरगा.