धाराशिव : तालुक्यातील येडशी येथील जिल्हा परिषद शाळेत दिवसेंदिवस टवाळखोरांचा उपद्रव वाढत चालला असून, यामुळे मुख्याध्यापक, शिक्षकही त्रस्त आहेत. शुक्रवारी मराठवाडा मुक्तीसंग्राम वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येलाही अज्ञातांनी रविवारी ज्या ठिकाणी ध्वजारोहण करायचे आहे, त्याच स्टेजच्या फरशीची तोडफोड केली. यामुळे पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारती मुलाची शाळा, कन्याशाळा, उर्दू शाळा अशा तीन शाळा भरतात. या परिसरात झेंडा वंदन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी ग्रामपंचायतीकडून स्टेज बनवण्यात आले आहे. याच स्टेजला लावण्यात आलेली फरशीची अज्ञातांनी तोडफोड केली. शाळेला चोहोबाजूंनी संरक्षण भिंत बांधण्यात आली असली तरी रात्रीच्या वेळी काही टवाळखोर शाळेच्या आवारात येऊन दारू पितात तसेच या ठिकाणी वाढदिवस साजरा करून दारूच्या नशेत धिंगाणा घालतात.
वाढदिवसानिमित्त कापलेला केक परिसरात, खिडक्या, दरवाजे यावर लावला जातो. तसेच पाण्याचे पाईप, खिडक्या, दरवाजे, कुलूप तोडून शालेय साहित्याचे नुकसानही केले जाते. शाळेच्या आवारात चिखल, डांबर, शेण टाकणे, अश्लील चित्र रेखाटने असे प्रकार नेहमीच घडत असतात. विशेष म्हणजे, हे कारणामे उघड होऊ नयेत यासाठी परिसरात लावलेले लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे देखील या टवाळखोरांनी चोरून नेले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.