धोत्री गावानजीक मैदानात शाळा बंद असल्याने चौघे शाळकरी मुले क्रिकेट खेळत होते. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारे, विजांच्या कडाक्यासह पावसाला सुरुवात झाली. या पावसा दरम्यानच अचानक वीज काेसळून करण साईनाथ मस्के (वय १२, रा धोत्री) याचा जागीच मृत्यू झाला. इतर मुले या घटनेतून बचावली. प्रदीप मस्के यांनी घटनेची माहिती दिल्यानंतर तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन पंडीत, पाेउपनि रमेश घुले, बीट अंमलदार संजय राठोड यानी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. काटगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून रात्री धोत्री स्मशानभूमीत दगावलेल्या मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी तामलवाडी पाेलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.
चाैकट...
वीजपुरवठा खंडित...
शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात महावितरण कंपनीच्या खांबावर वीज पडली. त्यामुळे जवळपास आठ खांब आडवे झाले. परिणामी धोत्री गावाचा वीज पुरवठा रात्रभर बंद होता.