धाराशिव : उस्मानाबाद लोकसभेतील महायुतीच्या जागेचा अन् उमेदवारीचाही गुंता अखेर सुटला आहे. मागील चार दिवसांपासून सुरू असलेली चर्चा अखेर खरी ठरली. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे लोकसभेतील भाऊबंदकीचा दुसरा अध्याय या लढतीच्या निमित्ताने लिहिला जाणार आहे.
महाविकास आघाडीतून शिवसेनेचे (ठाकरे) विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. इकडे महायुतीत मात्र जागा कोणी लढवायची, यावरून बरेच दिवस खल सुरू होता. मागच्या शनिवारीच ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) सोडण्याचा निर्णय झाला होता. यानंतर तुल्यबळ उमेदवार शोधण्यात दोन दिवस गेले. यानंतर उमेदवारीबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच अंतिम केला. तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करवून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. अर्चना पाटील या मागील टर्ममध्ये जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राहिलेल्या आहेत. राजकीय क्षेत्रात त्यांचा वावर असल्याने उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक यंदाही रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
भाऊ-भाऊ नंतर आता दीर-भावजय...दोन वेळा विधानसभा निवडणुकीत आमनेसामने झाल्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही ओम राजेनिंबाळकर विरुद्ध राणाजगजितसिंह पाटील यांच्यात झाली होती. हे दोघेही नात्याने चुलत बंधू आहेत. आता यावेळी पाटील यांच्या पत्नी रिंगणात असल्याने भाऊबंदकी यावेळी कायम राहिली असून, यावेळी दीर-भावजयीत सामना रंगणार आहे.