उमरगा :
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावर्ती भागात करहुन्नवी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. याला सीमावर्ती भागात कर्नाटकी बेंदूर या नावाने ओळखले जाते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व सध्या पावसाने ओढ दिल्याने शेतकरी बांधवांनी हा सण साधेपणाने साजरा केला.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा मोठा सण पोळा. पाेळा सणाप्रमाणे कारहुन्नवी हा सण सीमावर्ती भागात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षी सणावर कोरोनाचे सावट आहे. बाजारपेठ अद्याप पूर्णत: सुरू नसल्याने गाय, बैलांना सजवण्यासाठीचे साहित्य विक्रीसाठी आलेले नाही. शेजारील आळंद, बसवकल्याण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ पौर्णिमेस कारहुन्नवी सण साजरा करण्यात येतो. शेतकरी पशुधनास सजवण्यासाठी मोठ्या हौसेने साहित्याची खरेदी करतात. प्रामुख्याने कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर साहित्य खरेदीसाठी शेतकरी तालुक्यातील उमरगा, मुरूम या बाजारपेठत येतात. सध्या पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यातच कोरोनाचे संकट अद्याप आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अत्यंत साधेपणाने हा सण साजरा केला. अनेक शेतकऱ्यांनी मिरवणुका रद्द करून घराच्या घरी विधिवत पूजा केली, तर काहीनी बैलाची रंगरंगोटी करून, सजवून बैलांना झुली, गळ्यात माळा घालून मारुतीच्या देवळाला प्रदक्षिणा घालून गावातून मिरवणूक काढली.