उस्मानाबाद : एका गोडाऊनमधून चोरीस गेलेले ३ लाख १९ हजार ६० रूपयांचे ६३७ पाईप आनंदनगर पोलिसांनी जप्त केले़ ही कारवाई २० फेब्रुवारी रोजी शहर व तालुक्याच्या विविध ठिकाणी करण्यात आली़ या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली असून, एकजण फरार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली़आनंदनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या कारवाईबाबत माहिती देण्यासाठी मंगळवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ देशमुख म्हणाले, शहरातील तांबरी विभागात राहणारे दिलीप भाऊसाहेब काळे यांचे भानूनगर भागात गोडाऊन आहे़ या गोडाऊनच्या भिंतीच्या विटा काढून चोरट्यांनी मागील सहा महिन्यांपासून पाईप चोरी केली होती़ गोडाऊन व दुकानातील कागदपत्रांच्या तपासणीदरम्यान पाईप चोरी झाल्याचा प्रकार काळे यांच्या लक्षात आला होता़ त्यानंतर काळे यांनी आनंदनगर पोलीस ठाणे गाठून गोडाऊनमधून ५४ हजार ७६५ रूपयांचे पाईप चोरीस गेल्याची फिर्याद दिली होती़ या फिर्यादीनंतर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक दिपाली घाटे-घाडगे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिगंबर शिंदे, पोहेकॉ बाबुराव चव्हाण, पोना सुधाकर भांगे, पोना शाहुराज धनवडे, पोकॉ प्रदीप तोडकरी, अशोक ढगारे यांनी शहरातील संशयित पृथ्वीराज रामदास गौंड-पाटील याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली़ गौंड-पाटील याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गोडाऊनमधून पाईप चोरी केल्याचे सांगितले़ तसेच कोणी संशय घेऊ नये म्हणून पाईपांची एजन्सी मिळाल्याचे सांगून त्याने शेतकऱ्यांना पाईप विक्री केले होते़ मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गौंड-पाटील याच्या प्लॉटवरून व खेड, वाघोली, बावी आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांकडून ६३७ पाईप जप्त केल्याची माहिती देण्यात आली़ या प्रकरणातील दुसरा आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू असल्याचेही सांगण्यात आले़ यावेळी स्थागुशाचे पोनि हरिष खेडकर यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)
गोडाऊनमधून चोरलेले ६३७ पाईप जप्त
By admin | Published: March 01, 2017 1:09 AM