उस्मानाबाद - केंद्रपुरस्कृत स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहा गावे ‘ओडीएफ प्लस’ म्हणून निवडण्यात येणार आहेत. या गावांमध्ये पंधरावा वित्त आयाेग, राेहयाे, ग्रामपंचायत स्वनिधी तसेच इतर याेजनांच्या माध्यमातून गाव हागणदारीमुक्त करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.
ग्रामीण भागातील १०० टक्के गावे २०१८-१९ मध्ये हागणदारीमुक्त म्हणून घाेषित करण्यात आली आहेत. २०२०-२१ पासून स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत आता या गावामध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, उपलब्ध शौचालयाचा नियमित वापर, प्लास्टिक कचऱ्याचे संकलन व निर्मूलन करून गावातील उपलब्ध असलेल्या सार्वजनिक शौचालयाचा सुयोग्य वापर व इतर आनुषंगिक कामे पूर्ण करून शाश्वत स्वच्छता कायम ठेवणाऱ्या गावांना ‘ओडीएफ प्लस’ गावे म्हणून घाेषित केले जाणार आहे. याकरिता प्रथम टप्प्यात तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद, भूम तालुक्यातील वांगी बु., उस्मानाबाद तालुक्यातील गोपाळवाडी, परंडा तालुक्यातील पिंपळवाडी व वाशी तालुक्यातील सोनेगावची निवड करण्यात आली आहे. या गावात शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी शौचालय सुविधा, आवश्यकतेप्रमाणे सार्वजनिक शौचालय सुविधा, वैयक्तिक शौचालयांचा १०० टक्के कुटुंबांकडून नियमित वापर, वैयक्तिक व सार्वजनिक स्तरांवरील घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छतेच्या सवयी, गावातील दर्शनीय भिंतीवर स्वच्छतेचे संदेश व प्लास्टिक कचरा संकलन केंद्र या स्वच्छतेच्या शाश्वत सुविधा गावात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यापूर्वी सदर गावांनी स्मार्ट ग्राम योजना, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व स्वच्छ भारत मिशनमध्ये जिल्हा व विभागीय स्तरावर मानांकन मिळाल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांनी दिली आहे.
चाैकट...
गावात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासह ओडीएफ प्लसचे सर्व निकष पूर्ण करून आलियाबाद, वांगी बु., बागलगाडी, गोपाळवाडी, पिंपळवाडी व सोनेगाव या ग्रामपंचायतींंप्रमाणे जिल्ह्यातील उर्वरित सर्व ग्रामपंचायतीने आपले गाव व जिल्हास ‘ओडीएफ प्लस’ मानांकनाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत.
- अस्मिता कांबळे, अध्यक्षा, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.