धाराशिव : केंद्र सरकार फायद्यातील कंपन्या विकत आहे. वाईट काळात देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी या कंपन्याच शाश्वत संपत्ती म्हणून कामी येणाऱ्या आहेत. मात्र, कुठलाही विचार न करता सरकारने त्यांच्या विक्रीचा सपाटा लावला आहे. देशाच्या भविष्यासाठी हे धोकादायक असून, विकसित देश आपल्यावर डोळे वटारण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशारा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी धाराशिव येथे झालेल्या सभेतून दिला.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या प्रचारार्थ गुरुवारी धाराशिव शहरात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतली. यावेळी ते म्हणाले, आपण आपली वडिलोपार्जित संपत्ती किंवा सोने विकतो का? विकत नाही; कारण, वाईट काळात तो शाश्वत दिलासा असतो. आपल्यासोबत ही संपत्ती असल्यास सावकार डोळे वटारू शकत नाही. अशीच स्थिती नफ्यातील कंपन्यांसंदर्भातील आहे. त्यांची विक्री केल्यास भविष्यात विकसित देश आपल्यावर डोळे वटारतील. २०१४ साली देशावर १००ला २६ रुपये असे कर्जाचे प्रमाण होते. सध्याचे सरकार सत्तेत आले आणि आता २०२४ ला हेच प्रमाण ८४ रुपयांवर गेले आहे. अशा स्थितीत देश चालू शकत नाही, असा इशारा त्यांनी दिला.
भाजपशी घरोबा नाहीच... आपण सेक्युलर मतांवरच निवडून येऊ. भाजपशी अजिबात घरोबा करणार नाही. मुस्लिमसह विविध समाज वंचित आहेत. उमेदवारही वंचित समाजातील आहेत. त्यामुळे सर्वांनी त्यांना साथ द्यावी, असे आवाहनही ॲड. आंबेडकर यांनी केले.
आम्हीच मदतीला आलो...उद्धवसेनेबाबत अविश्वास व्यक्त करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धवसेनेला मत म्हणजे भाजपला मत असल्याचे सांगितले. तसेच मागे धाराशिवमध्ये जे गुन्हे दाखल झाले, त्यावेळी काँग्रेस, उद्धवसेना मदतीला आली नाही. वंचित बहुजन आघाडीच युवकांच्या मदतीला आल्याचेही ॲड. आंबेडकर म्हणाले.