धाराशिव : जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजीच्या शाळा अटींची पूर्तता होत नसल्याने बंद करण्यात आल्या आहेत. या शाळेतून आता द्विभाषी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. मात्र, पालकांची मागणी लक्षात घेता सेमी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली असून, सोमवारी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकही झाली. त्यात अटी पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याचे ठरले.
धाराशिव जिल्ह्यात ग्रमीण भागातही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र, यामुळे गुणवत्तेचा स्तर घसरल्याचे डायटच्या संशोधनातून समोर आल्यानंतर सेमी बंद करून त्याऐवजी द्विभाषी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, यानंतरही पालकांकडून सेमी इंग्रजी सुरू करण्याबाबत सातत्याने मागणी केली जात होती. मागणीची तीव्रता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे व सीईओ राहुल गुप्ता यांनी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी बैठक घेतली. या बैठकीत पालकांची मागणी, शिक्षकांची मते यावर चर्चा होऊन शासन अटींची पूर्तता करूनच जेथून सेमीची मागणी होईल, तेथे हा अभ्यासक्रम सुरु करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. प्रशासनाने हा विषय सकारात्मकरीत्या घेतल्याने सेमीबाबतच्या पालकांच्या मागणीला बळ मिळाले आहे.