उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे आगामी खरीप हंगामावर चर्चासत्र पार पडले. यात शेतीविषयक विविध माहिती देण्यात आली.
या चर्चासत्रात कृषी, महसूल व जळकोट ग्रामपंचायतीने सहभाग नोंदविला. यावेळी कोविड-१९च्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. नळदुर्ग मंडल कृषी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आगामी खरीप हंगाम कसा हाताळायचा, यासंदर्भात माहिती देऊन बीबीएफ पेरणी तंत्रज्ञान, सोयाबीन लागवड व तंत्रज्ञान, सोयाबीनचे सुधारित वाण, बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन, सुक्ष्म मूलद्रव्ये, तण व्यवस्थापन, माती व पाणी परीक्षण, पावसाच्या खंडाचे व्यवस्थापन, तूर एकात्मिक पीक व्यवस्थापन, आंतरपीक पद्धती, मिश्र पीक पद्धती, मूलस्थानी जलसंधारण, मूग व उडीद पीक पद्धती या विषयावर सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच आगामी काळात खरीप हंगामात शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाणे वापरून लागवड खर्चात बचत करावी, असे सांगून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पअंतर्गत विविध योजनांची माहितीही यावेळी शेतकऱ्यांना दिली.
महसूल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांसंबंधी माहिती दिली. जळकोट ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोकराव पाटील, उपसरपंचपती बसवराज कवठे, ग्रामपंचायत सदस्य जीवन कुंभार, श्रीगणेश कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष मेघराज किलजे, नामदेव कागे, मंडल कृषी अधिकारी पी. एस. भोसले, कृषी पर्यवेक्षक डी. पी. बिराजदार, कृषी सहाय्यक जी. एस. कांबळे, ग्रामविकास अधिकारी जी. के. पारे, तलाठी तात्यासाहेब रुपनवर, अशोक दुधभाते आदी उपस्थित होते.