भूम ( उस्मानाबाद ) : शासकीय योजनेतून मिळालेल्या १ लाख ११ हजार ८६ रूपयांच्या लोकवाट्यात अपहार केल्याप्रकरणी येथील तालुका कृषी विभागाच्या तत्कालीन वरिष्ठ लिपिकाविरूध्द भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना १४ सप्टेंबर २००९ ते १७ जून २०१६ या कालावधीत भूम येथे घडली़
शासनाच्या वतीने भूम तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (एनएफएसएम) व राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (एनएचएम) योजना राबविण्यात येते़ या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पुरविण्यासाठी ३४०० रूपयांचा एक पावर स्प्रे, २७ हजार ४५० रूपये किंमतीच्या पाच एचपीच्या तीन विद्युत मोटारी, ८० हजार ४३६ रूपये किंमतीचे एचटीपीचे २२ नग यासाठी जवळपास १ लाख ११ हजार २८६ रूपयांचा लोकवाटा १४ सप्टेंबर २००९ ते १७ जून २०१६ या कालावधीत जमा झाला होता
हा लोकवाटा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील तत्कालीन वरिष्ठ लिपिक महेश मधुकर गडगडे यांनी उस्मानाबादेतील महाराष्ट्र कृषी अधिकारी महामंडळात भरला नसल्याचे चौकशीत समोर आले़ या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी गणेश भागवत दुरंदे यांनी भूम ठाण्यात फिर्याद दिली़ या फिर्यादीवरून तत्कालीन वरिष्ठ लिपिक तथा सध्या नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील कार्यालयात कार्यरत असलेले महेश गडगडे विरूध्द भूम पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़