कळंब (जि. धाराशिव) : संपुर्ण ऑगस्ट कोरडा गेलाय, यात खरीपातील प्रमूख पीक होरपळून गेलेय. यामुळे नियमाच्या आडकाठी घालत नव्हे तर सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या या मागणीसाठी कळंब येथे शेतकरी पुत्रांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
कळंब तालुक्यातील ६८ हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पीक होरपळत आहे. पावसाच्या बाबतीत जून असातसाच केला. जुलै रिमझिम पावसाचा ठरला. ऑगस्ट तर जवळपास कोरडाच.यामुळे पिके करपून गेली आहेत. यातच शासन २१ दिवसाचा खंड, नियम, निकषाच्या चौकटीत वेळ घालवत आहे.
यामुळे शेतकऱ्यांना सरसकट प्रतिहेक्टरी मदत द्यावी, नियम व अटी लादू नयेत या मागणीसाठी वाळलेल्या सोयाबीनचे काड सोबत घेत कळंब येथील तहसील कार्यालयासमोर शेतकरी पुत्रांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. यात शुभम राखुंडे, भिमा हगारे, शशिकांत पाटील, प्रतिक गायकवाड, विपूल देशमुख, गोकुळ घोगरे, अमर मडके, अशोक जगताप, विठ्ठल यादव यांनी धनंजय ताटे आदी शेतकरी सहभागी झाले आहेत. या आंदोलनास आ. कैलास पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा श्रीधर भवर, शिवसेनेचे दिपक जाधव आदींनी भेट देत पाठींबा दिला आहे.