तामलवाडी (जि.उस्मानाबाद) : गुरुवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यावेळी वीज कोसळून पांगरदरवाडी येथे पाच, तर केमवाडी येथील दोन पशुधनाचा जागीच मृत्यू झाला आहे. याशिवाय आंब्याचेही मोठे नुकसान या भागात झाले आहे. तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील संदीप तानाजी शिंदे हे कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी गेले वर्षभरापासून कुटुंबासह शेतात राहत आहेत. त्यांनी पत्र्याच्या शेडनजीक वडाच्या झाडाखाली चार म्हशी, एक गाय अशी पाच दुभती जनावरे नेहमीप्रमाणे बांधली होती, तर केमवाडी शिवारातील शेतात मौला गुलाब शेख यांनी चार बैल बांधले होते. गुरुवारी मध्यरात्रीपासून तामलवाडी भागात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली होती. पहाटे २ वाजण्याच्या सुमारास पांगरदरवाडी शिवारात वीज पडल्याने संदीप शिंदे यांच्या चार म्हशी व १ गाय, अशी पाच जनावरे जागीच मृत्युमुखी पडली, तर केमवाडी शिवारात पहाटे १ वाजता वीज पडल्याने दोन बैल जागीच मरण पावले. या बैलांशेजारीच असलेले अन्य दोन बैल बालंबाल बचावले. या दुर्घटनेमुळे दोन्ही शेतकऱ्यांचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पशुधनाचा पंचनामा तामलवाडी पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार गोरोबा गाढवे, तलाठी स्वामी, मांळुब्राचे पशुधन अधिकारी सचिन जोगदंड सरपंच विजय निंबाळकर यांनी केला. या अवकाळी पाऊस व वाऱ्याचा फटका तामलवाडी शिवाराला चांगलाच बसला आहे. शेतकरी दत्तात्रय जनार्दन घोटकर यांच्या शेतात असलेल्या केशर व नीलम या प्रजातीच्या १७० आंब्यांच्या झाडाची फळगळती झाली. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
उस्मानाबाद, तुळजापुरात गारा...
गुरुवारी पहाटे जिल्ह्यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला होता. दरम्यान, गुरुवारी दुपारी पुन्हा पावसाने हजेरी लावली. यावेळी वारे नसले तरी विजांचा कडकडाट सुरूच होता. नंतर पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. काही क्षणांतच छोट्या आकाराच्या गारा पडण्यास सुरुवात झाली. तुळजापुरातही दुपारी पावणेएक वाजण्याच्या सुमारास वीज, वाऱ्यासह पाऊस झाला. येथेही काहीक्षण गारपीट झाली.