उस्मानाबाद : मोबाइलमध्ये शेकडो नंबर सेव्ह होत असल्यामुळे कोणीही मोबाइल नंबर पाठ करीत सांगण्यात येते. दहा जणांना त्यांच्या घरातील मोबाइल नंबर विचारला असता त्यातील सात जणांना तो सांगता आला नाही ही बाब 'लोकमत'ने केलेल्या रिॲलिटीमधून समोर आलेली आहे.
प्रत्येकाच्या हातात ॲण्ड्राइड मोबाइल आलेला आहे. त्याची क्षमतादेखील बऱ्यापैकी असल्याने मोबाइल नंबर सेव्ह करायला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. परिणामी शेकडो मोबाइल नंबर त्या एकाच मोबाइलमध्ये सामाविष्ट होत असल्यामुळे शक्यतो कोणीही मोबाइल नंबर पाठ करीत नाही हीच बाब प्रकर्षाने सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणवली. ज्यांच्याशी कायम संपर्क असतो त्याचा मोबाइल नंबर मात्र पाठ आहे. त्यात असे काही नागरिक सापडले की त्यांचा त्यांच्या घरातील नंबरही पाठ नाही.
'अ' व्यक्तीला घरातील मोबाइल क्रमांकाचे सुरुवातीचे चार अंक सांगता आले. तर नंतरचे अंक सांगता आले नाहीत.
'ब' व्यक्तीला स्वत:चा नंबर सांगता आला मात्र घरातील मोबाइल नंबर पाठ नसल्याचे त्याने सांगितले.
'क' व्यक्तीने घरात असलेल्या मोबाइल नंबरचे सुरुवातीचे चार अंक सांगितले.
'ड' व्यक्तीने घरात दोन मोबाइल असल्याने ते दोन्ही नंबर मोबाइलमध्ये सेव्ह केले असल्याने पाठ करायची गरज पडली नाही, असे सांगितले.
तरुणांपासून वृद्धांपर्यंत सारे सारखेच
एकंदरीत पाहता तरुणांपासून वृद्धांपर्यंत जवळपास सर्वच जण सारखेच निघाले आहेत. एकदम विचारले असता एकालाही घरातील सदस्याचा मोबाइल नंबर लगेच सांगता आला नाही.
आता सर्वांकडेच स्मार्टफोन असल्याने जास्तीत जास्त वेळ ऑनलाइन राहत आहेत. फोनमध्ये नंबर सेव्ह केला जात असल्याने नंबर लक्षात ठेवण्याकडे फारसे कोणी लक्षच देत नाही.
बायकांनाही पतीदेवाचा नंबर आठवेना
माझ्याकडे स्मार्ट फोन आहे. मला माझा मोबाइल नंबर पाठ आहे. मात्र, पतीचा मोबाइल नंबर पाठ नाही. मोबाइलमध्ये नंबर सेव्ह राहत असल्याने पाठ करण्याची गरजच पडत नाही. त्यामुळे पाठ केला नाही.
एक गृहिणी
मला माझ्या पतीने दोन महिन्यांपूर्वी मोबाईल घेऊन दिला आहे. त्यात सर्व घरातील व्यक्तींचे मोबाइल नंबर सेव्ह केले आहेत. नाव सर्च केले की काॅल करता येतो. पतीचा नंबर पाठ करण्याची गरज पडली नाही.
एक गृहिणी
पोरांना मात्र आई-बाबांचा नंबर पाठ
शाळेत आई-बाबांचा मोबाइल नंबर दिला आहे. तसेच शाळेच्या डायरीवरही मोबाइल क्रमांक लिहून ठेवला होता. त्यामुळे दोघांचाही नंबर पाठ करून ठेवला आहे. गरज पडल्यास कोणाच्याही मोबाइलवरून काॅल करता येतो.
स्नेहल वाघमारे, विद्यार्थिनी
माझ्याकडे माझ्या वडिलांनी मोबाइल दिलेला आहे. बाहेर कुठे जाताना तो माझ्यासोबत असतो. तरीदेखील मला आई-बाबांचा नंबर पाठ आहे. मोबाइलला चार्जिंग नसल्यानंतर इतरांच्या मोबाइलद्वारे काॅल करत असतो.
अक्षय जाधव, विद्यार्थी
लहान मुलांची स्मरणशक्ती चांगली
ताणतणाव, बैठे कामामुळे प्रौढ व्यक्तींना शारीरिक आजार वाढतात. त्याचा परिणाम स्मरणशक्तीवर होतो. त्यामुळे नंबर लक्षात राहत नाहीत.
लहान मुलांचे वय हे शिकण्याचे असते. ताण तणाव नसल्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा होतो. त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती चांगली राहते.
डॉ. महेश कानडे, मानसोपचारतज्ज्ञ