शदर पवार आमचे दैवत, अजीतदादा आश्वासक चेहरा-संजय बनसाेडे
By बाबुराव चव्हाण | Published: August 26, 2023 07:47 PM2023-08-26T19:47:37+5:302023-08-26T19:47:46+5:30
बॅनरवर साहेबांचा फाेटाे असणारच...
धाराशिव : देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी देशाचा प्रचंड गतीने विकास करीत आहेत. त्याच गतीने महाराष्ट्राचाही विकास व्हावा, यासाठी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी भाजपासाेबत सत्तेत सहभागी हाेण्याची भूमिका घेतली. पवार साहेबांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही पुढे जात आहेत. ते आमचे दैवत, तर अजीतदादा आमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा आहेत, असे मत राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसाेडे यांनी मांडले.
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या धाराशिव जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळावा शनिवारी झाला. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. त्यांच्या समवेत आमदार विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील, सुरेश बिराजदार, गाेकुळ शिंदे यांचीही उपस्थिती हाेती.
राज्यात आता अजीतदादा पर्व सुरू झाले आहे. त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मंत्री पदाची संधी दिली असून धाराशिवची जबाबदारी माझ्याकडे साेपविली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विकासाच्या बाबतीत धाराशिव लातुरच्या पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी दिला. बॅनरवरील शरद पवार यांच्या छायाचित्राबाबत विचारले असता, ‘पवार साहेब आमचे दैवत हाेते. आहेत आणि पुढेही राहील. ते आमच्या ऱ्हदयात आहेत. त्यामुळे त्यांचा फाेटाे आमच्या ऱ्हदयासाेबतच बॅनरवरही राहणारच’, अशी ठाम भूमिका मांडली.
लाेकसभेचा निर्णय वरिष्ठ घेतील...
धाराशिव लाेकसभेचा उमेदवार ठरविण्याचे अधिकार वरिष्ठांचा आहे. त्यामुळे हा निर्णय तिथेच हाेईल. मात्र, जाे काेणी उमेदवार दिला जाईल ताे महायुतीचाच असेल. आम्ही तिन्ही पक्ष मिळून त्या उमेदवारास निवडून आणू, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.