बाबुराव चव्हाण, धाराशिव : राज्य सरकारच्या पुढाकारातून शिवरायांचे वाघनखं भारतात आणली जात आहेत. यावरही आता आदित्यसाहेबांनी शंका घेतली आहे. वाघनखं खरी की खाेटी ते बघा, असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र, हे बघायला नेमकं कुणालां गाठलं पाहिजे हे काही त्यांनी सांगितलं नाही. ते नाव आदित्य ठाकरेनं सांगावं, मी त्याला गाठताे अशा शब्दात शिवसेना आमदार (शिंदे गट) शहाजी बापू पाटील यांनी प्रहार केला.
धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी पंधरा महिन्यात ५ हजार कोटींचा निधी आणल्याबद्दल युथ फाेरमच्या पुढाकारातून रविवारी भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा नागरी सत्कार साेहळा पार पडला. याप्रसंगी ते बाेल हाेते.
आ. शहाजी पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहेत. राज्यातील महायुती सरकारच्या पुढाकारातून शिवरायांचे वाघनखं इंग्लंडमधून भारतात आणली जाताहेत. तुम्हा-आम्हांसाठी ही गाेष्ट अभिमानाची आहे. मात्र, आदित्यसाहेबांनी वाघनखांबाबतच शंका उपस्थित केली. वाघनखं खरी की खाेटी, हे बघा असं त्यांचं म्हणंण आहे. हे बघण्यासाठी नेमकं काेणाला गाठलं पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं नाही. ते नाव आदित्य ठाकरेनं सांगावं, मी त्याला जावू गाठताे. त्याला हुडकूनही काढताे. यासाठी बाळा, अगाेदर नाव तर सांग, अशा शब्दात ठाकरेंवर सडकून टिका केली. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री परदेशात जावून उद्याेगाच्या माध्यमातून कराेडाे-कराेडाेची गुंतवणूक राज्यात आणत आहेत. यावरूनही आदित्य ठाकरे टिका करताहेत. दरराेज परदेशात कशाला जाताहेत, असा प्रश्न विचारताहेत. हेच आदित्य ठाकरे पर्यटणमंत्री असताना किमान २५ वेळा परदेश दाैऱ्यावर गेले हाेते. तेव्हा परदेशात जावून ते काय करीत हाेते, असा खाेचक सवालही त्यांनी केला.
मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे भेटलेच नाहीत...
उध्दवसाहेब मुख्यमंत्री असताना दाेन वर्षांच्या काळात कधी भेटलेच नाहीत. आम्ही कामे घेऊन जायचाे, मात्र त्यांची भेट व्हायची नाही. त्यामुळे मतदारसंघातील लाेकांची कामं हाेत नव्हती. आणि मुख्यमंत्री भेटत नाहीत हे जनतेला सांगताही येत नव्हतं. परंतु, आता तसं नाही. काेणतंही काम घेऊन जा, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री भेट देतात अन् कामेही मार्गी लावतात, असे आ.शहाजी बापू पाटील म्हणाले.