तुळजापूर (जि. धाराशिव) : श्री तुळजाभवानीच्या गणेश विहारात ‘आई राजा उदे-उदे, सदानंदीचा उदे-उदे, बोल भवानी माता की जय, शाकंभरी माता की जय’च्या गजरात व नगारा, बँड, संबळाच्या निनादात हजारो भाविकांच्या उपस्थितीत शाकंभरी नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला. यजमान भोपे पुजारी विनोद सोंजी व पत्नी अनुराधा या दाम्पत्याच्या हस्ते दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी माेठी गर्दी केली हाेती.
गुरुवारी सकाळी सहा वाजता देवीची अभिषेक घाट होऊन नित्योपचार पंचामृत अभिषेक पार पडले. यानंतर महंत व भोपे पुजारी शुभम कदम यांनी देवीस नैवेद्य दाखवून धुपारती करून अंगारा हे विधी पार पडले. यानंतर तुळजाभवानी देवीची विशेष अलंकार पूजा बांधण्यात आली. दुपारी बाराच्या सुमारास शाकंभरी यजमान विनोद सोंजी यांनी श्री तुळजाभवानी देवीची शासकीय आरती करून गोमुख तीर्थाजवळील घटकलशाची विधिवत पूजा केली व हे घटकलश सवाद्य मंदिरात आणण्यात आले. गणेश विहारात घटकलश ठेवण्यात आलेल्या वावरीत ठेवून पारंपरिक पद्धतीने त्याचे पूजन करून घटस्थापना करण्यात आली.
पुढील आठ-दिवस चालणाऱ्या विविध धार्मिक विधीसाठी ब्राह्मणवृंदास यजमान भोपे सोंजी दाम्पत्याच्या हस्ते अनुष्ठानाची वर्णी देण्यात आली. यावेळी उपस्थित पुजारी सेवेकरी व भाविकांनी शाकंभरी माताचा जयघोष केला. यावेळी देवीचे महंत तुकोजीबुवा, भोपे पुजारी तहसीलदार सोमनाथ माळी, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले व सिद्धेश्वर शिंदे, धार्मिक विभागाचे विश्वास कदम, जयसिंग पाटील, शासकीय उपाध्ये बंडोपंत पाठक, ॲड. शैलैश पाठक, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर, अतुल मलबा, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष बिपीन शिंदे, किशोर गंगणे, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, मकरंद प्रयाग, हेमंत कांबळे यांच्यासह सेवेकरी अंबादास औटी उपस्थित हाेते.
पुण्याई फळास आलीशाकंभरी नवरात्र उत्सव हा पुजाऱ्यांचा असतो. यावर्षी आमच्या भोपे मंडळाला यजमानपद मिळाले आहे. भोपे मंडळाने मला यजमानपद देऊन श्री तुळजाभवानीची सेवा करण्याची संधी दिली आहे. तुळजाभवानीची पुण्याई फळास आली म्हणून आपणास शाकंभरी यजमानपद मिळाले.-विनोद सोंजी, तुळजापूर.