बालाजी अडसूळ
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत घेतलेल्या अपार कष्टामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारमध्ये स्थान मिळाले. विशेष म्हणजे 80 वर्ष वयातही तरुणालाही लाजवेल एवढ्या क्षमेतेनं पवारांनी धावपळ केली. पायाला भिंगरी लावल्यागत पवार महाराष्ट्र दौरा करत होते. त्यात, साताऱ्यातील भर पावसातील सभेमुळे पवारांबद्दल तरुणाईच्या मनात कमालीचा आदर वाढला. नुकतेच, 12 डिसेंबर रोजी त्यांनी आपला 80 वा वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेऊन हा वाढदिवस साजरा करण्यात आला. मात्र, कळंब तालुक्यातील एका शेतकरीपुत्राने पवारांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
कळंब तालुक्यातील निपाणी गावच्या शेतकरी पुत्राने तब्बल 4.5 एकर शेतजमिनीमध्ये शरद पवारांची प्रतिमा साकारून त्यांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे ही प्रतिमा साकारण्यासाठी तब्बल 15 दिवसांची वाट या शेतकरीपुत्राला पाहावी लागली. त्यामुळेच, वाढदिवसानंतरही तीन दिवसांनी ही प्रतिमा मातीतून उदयास आली. विस्तीर्ण असं साडे चार एकर क्षेत्र...यात पंधरा दिवसाची पेरणीपुर्व मशागत...त्यावर केलेलं आखीव-रेखीव रेखांकन...यात आठ दिवसापूर्वी विविध बियाणांची केलेली पेरणी...हे बीज अंकुरलं अन् साकार झाली तब्बल १ लाख ८० हजार स्क्वेअर फूट आकाराची शरद पवार यांची प्रतिमा.अष्टपैलू आर्टीस्ट मंगेश निपाणीकर यांनी अशी विक्रमी कलाकृती सादर करूण शरद पवार यांना दिलेल्या शुभेच्छाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. गत पाच दशकं गल्ली ते दिल्लीपर्यतच्या राजकीय सारीपाटावरील एक महत्वाचं व्यक्तिमत्त्व म्हणून शरद पवार यांना गणलं जातं. त्यांच्यावरती प्रेम करणारे असंख्य चाहते राज्यभर आहेत. मात्र निपाणी (ता.कळंब) येथील भुमिपूत्र व राज्यभर एक अष्टपैलू आर्टीस्ट म्हणून नावलौकीक मिळवलेल्या मंगेश अनिरुद्ध निपाणीकर या कलाप्रेमीने अफलातून कलाकृती सादर करत पवारांना आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत.
निमित्त होत १२ डिसेंबर या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे. ऐंशी वर्षाचे शरद पवार मराठी मुलूखातील एक ज्येष्ठ नेते असले तरी आजही ते असंख्य तरूणाईसाठी एका दिपस्तंभाप्रमाणे कार्यरत आहेत. गुरूवारी राज्यभर पवार यांचा वाढदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. मात्र, पवारांच्या कर्तृत्वाने भारावून गेलेल्या मंगेश निपाणीकर या तरूण कलाकाराने यंदाचा शरद पवार यांचा वाढदिवसा आपल्या कलाकृतीद्वॉरे 'स्पेशल' करण्याचा संकल्प केला होता.यासाठी त्यांनी 'ग्रास पेटींग' या कला माध्यमांची निवड केली. फक्त यावेळी तृणाऐवजी तरकारी व खाद्यान्न प्रवर्गातील बियाण्यांचा वापर करत अंकूरलेल्या बिंजाकूराच्या माध्यमातून पवार 'साहेब' साकारण्याचा प्रयत्न सुरू केला.यासाठी गावातील सुरेश पाटील व बाळासाहेब पाटील या बंधूच्या निपाणी-नायगाव रस्त्यावरील क्षेत्राची निवड केली.
जवळपास साडेचार एकर क्षेत्राची पंधरा दिवस पेरणीपुर्व मशागत केली. यानंतर या जमिनीवर शरद पवार यांची प्रतिमा साकार करण्यासाठी तंतोतंत रेखांकन करण्यात आले.हे रेखांकन ग्राफिक्स डिझाईनवर बेतलेलं होतं. यासाठी विविध आकारमानं परिणामकारकरित्या मांडण्यात आली. यानंतर दिनांक ४ डिसेंबरला यामध्ये कल्पकरित्या बियाणं पेरण्यात आलं.चांगली उगवणक्षमता होण्याकरीता ओलाव्याची काळजी घेतली.याकरीता आवश्यक त्या आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यात आला.
गुरुवारी केलेल्या कष्टाला यश आले. अखेर सकाळपासून अंकूर फुटण्यास सुरूवात झाली.पुरेसे बिंजाकूर दृष्टीपथात आल्यानंतर आकाशातून यावर नजर टाकली असता साकार झाली ती ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रतिमा.