कळंब : शिक्षण कशासाठी? तर नोकरी करून स्थिरस्थावर होण्यासाठी ! असा समज झालेल्या समाजातील ‘ती’ २१ वर्ष वयाची मुलगी मात्र नोकरीच्या मागे न लागता ‘स्वयंसिद्धा’ होण्याचा संकल्प करते अन् त्यास वास्तवात आणत इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देते. कळंबसारख्या ठिकाणी आपलं ‘स्टार्ट अप’ करणाऱ्या पौर्णिमा मोहिते या तरुणीची ही कथा ग्रामीण भागातील मुलींसाठी खरोखरच प्रेरक अशी आहे.
कळंब येथील पौर्णिमा नितीन मोहिते ही एक ध्येयवेडी तरूणी आहे. राज्यस्तरावर आपला ठसा उमटवलेल्या अष्टपैलू खेळाडू दिवंगत नितीन मोहिते यांची ती कन्या. बालपणीच कुंटुंबावर संकट कोसळले. पितृछत्र हरवलं. यातूनही पौर्णिमाने मोठ्या धीराने स्वतःच करिअर घडवलं. रेषांना आकार देत चित्रकृती साकारण्याचा बालपणीचा छंद तिने पुढेही जोपासत विविध रंगछटा साकारल्या. त्याकरिता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण उस्मानाबाद येथे पूर्ण केल्यानंतर ‘आर्ट’ क्षेत्रातील पदवी घेण्यासाठी पुणे शहर गाठले. तेथे नामवंत अभिनव कला महाविद्यालयात ‘फाईन आर्ट’ पूर्ण करत असतानाच लेखन, चित्रकला असे छंदही पौर्णिमाने जपले.
दरम्यान, अंगी जिद्द, डोक्यात कल्पना व मनात भरारी घेण्याचं स्वप्न असणाऱ्या व्यक्ती प्रयत्नवादी असतील तर यश हमखास मिळते, हा मूलमंत्र पौर्णिमाला माहीत होता. यामुळे शिक्षण पूर्ण होतानाच नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असतानाही तिने स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा संकल्प केला. यासाठी कार्यस्थळ निवडले ते आपली मातृभूमी कळंब. स्वतःच्या पायावर उभे राहायचे, असा संकल्प करत तिने अगरबत्ती उत्पादन व विक्री करण्यासाठी एक फर्म रजिस्टर केली. याद्वारे आता प्रत्यक्ष उत्पादन व मार्केटिंग सुरू झाले आहे. यातून अन्य काही संवगड्यांना रोजगाराच्या संधीदेखील उपलब्ध झाल्या आहेत.