वाशी : प्रभागातील पाणी, रस्त्याचा प्रश्न सोडवा, अन्यथा नगर पंचायतीवर महिलांचा मोर्चा काढू, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
येथील प्रभाग क्रमांक १७ सह इतर प्रभागामध्येही पाणी पुरवठा व रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या अनुषंगाने शेकापचे ज्येष्ठ नेते भाई भगवानराव उंदरे यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. मागील काही दिवसापासून शहरासह प्रभाग क्रमांक १७ मध्ये पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. नगर पंचायतीने चार दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन केले असले तरी या भागात कधी दहा तर कधी पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा होतो. यामुळे भर पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच प्रभागातील वेस ते माळी गल्ली, उंदरे गल्ली या भागातील रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून दुरुस्ती झालेली नसल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. नाल्यांचेही बांधकाम रखडलेले आहे. थोड्या बहुत पावसाने रस्त्यांना तळ्याचे स्वरूप येऊन नागरिकांचे हाल होतात. रस्त्यावरील पाणी घरात येत आहे. त्यामुळे सदरील कामे तात्काळ मार्गी लावावीत, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर प्रभागातील ३५ महिलांच्या स्वाक्षरी आहेत.