उस्मानाबाद - शिवसेनेसोबत गद्दारी केलेल्या शिंदे गटातील मंडळी ‘आम्ही बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण’ पुढे घेऊन जात आहोत, असे कितीही सांगत असले तरी ते सत्य नाही. ही मंडळी भाजपाचे विचार आणि अमित शाह यांची शिकवण पुढे नेत असल्याचा घणाघात शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी केला.
उस्मानाबादेत रविवारी शिवसैनिकांचा सन्मान सोहळा घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय ढोबळे, तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, तालुका उपप्रमुख विजय सस्ते, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पाटील म्हणाले, मागील अडीच वर्षांत शिवसेनेने प्रचंड काम केले आहे. जिथे काम झाले नाही, असे एकही गाव नाही. परंतु, आपण त्याचे डॉक्युमेंटेशन करण्यात कमी पडतो. सध्या प्रचार-प्रसिद्धीचा जमाना आहे. त्यामुळे यात शिवसैनिकांनी कमी पडू नये, असे आवाहन केले. ठाकरे सरकारच्या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत मिळाली. परंतु, सध्याच्या सरकारने सततचा पाऊस, गोगलगाय आणि अन्य कीड रोगामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या क्षेत्राचे आकडे पाहिले असता, यांची दानत लक्षात येते. या सरकारकडे बुलेट ट्रेनसाठी करोडोंचा पैसा आहे, परंतु शेतकऱ्यांसाठी नाही. मात्र, सरकारकडे शेतकऱ्यांचा कष्टाचा छदामही सोडणार नाही. सरकारच्या मानगुटीवर बसून भरपाई मिळवून देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. शिंदे गटात गेलेली मंडळी ‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण पुढे नेत आहोत’, असे प्रत्येक ठिकाणी सांगत आहेत. मात्र, हे धादांत खोटे आहे. या मंडळीला भाजपाचे विचार आणि अमित शाह यांची शिकवण पुढे न्यायची आहे, अशा शब्दांत त्यांनी शिंदे गटावर प्रहार केला.
आमचा आम्हाला द्या, मोठा प्रकल्प गुजरातला न्या...
राज्यातील पुण्यात येऊ घातलेला फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला आहे. आता राज्यातील भाजप आणि शिंदे गटाचे सरकार ‘फॉक्सकॉनपेक्षाही मोठा प्रकल्प राज्यात आणू’, असे सांगत सुटले आहे. परंतु, फॉक्सकॉन प्रकल्प आमचा आम्हाला द्या आणि मोठा प्रकल्प गुजरातला न्या, अशा शब्दांत आ. पाटील यांनी सरकारमधील मंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.