लोहारा (जि.उस्मानाबाद) :शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या बंडखोरीनंतर त्यांच्या मतदारसंघात शिवसैनिक संभ्रमावस्थेत होते. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संभ्रवस्था दूर करत शिवसैनिकांनी आज लोहारा शहरात एकत्र येत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा देत, फटाके फोडून शिवसैनिकांनी पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे दाखून दिल्याचे चित्र पहायवयास मिळाले आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना सोबत घेत बंड करून भाजपाच्या साथीने मुख्यमंत्री पद मिळवले. शिंदेंच्या बंडात लोहारा-उमरगा तालुक्याचे शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले सामील आहेत. मात्र, आ. चौगुले यांचे राजकीय गुरु माजी खा.रविंद्र गायकवाड यांनी मात्र आपली निष्ठा शिवसेनेशी व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ही आ. चौगुले यांच्या बंडखोरीस एकदोन अपवाद वगळता फारसा विरोध झाला नाही. तसेच त्यांच्या बंडखोरीचे समर्थन ही कोणी केले नाही. यामुळे लोहारा शहरासह तालुक्यातील शिवसैनिकांत संभ्रमावस्था होती.
दरम्यान, आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ही संभ्रवस्था दूर झाली. माजी खा.रविंद्र गायकवाड यांचे पुत्र किरण गायकवाड यांच्यातर्फे उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या. तसेच शहरातील ठाकरे यांच्यावर निष्ठा असलेले शिवसैनिक खुलेपणाने पुढे आले. शहरप्रमुख सलिम शेख व शिवसैनिकांनी शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सुर्यवंशी, लोहारा शहरप्रमुख सलिम शेख, पंचायत समितीचे माजी सभापती विलास भंडारे, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख शेखर पाटील, माजी उपनगरध्यक्ष प्रताप घोडके, पंडीत बारगळ, प्रताप लोभे, शाम नारायणकर, महेबुब गवंडी, रघुवीर घोडके, महेबुब फकीर, परवेज तांबोळी, राजू रवळे, भरत सुतार, दत्ता पाटील, धर्मवीर जाधव, प्रेम लांडगे, बळी कांबळे, अजिम हेड्डे, पिंटू गोरे, कुलदिप गोरे, कुंडलीक मोरे, अतिक पठाण, बालाजी माशाळकर, महेश बिराजदार, शिवा सुतार, योगेश गोरे, चेतन गोरे यांच्या आदी शहरासह तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.
सोशल मीडियातही शिवसैनिक झाले सक्रीय
आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या बंडानंतर सोशल मिडीयापासून चार हात दुर असलेले शिवसैनिक पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत सक्रीय झाले आहेत. लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी आतिषबाजी करत उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.