भूम (जि. धाराशिव) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे संकटकाळात ज्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, तेच आता शिवसेना आणि त्यांच्या मुलास संपविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, शिवसेना आणि मला तुम्ही संपवू शकत नाहीत. मला संपविण्याचा वा घरी बसा म्हणण्याचा अधिकार शिवसैनिक आणि मायबाप जनतेचा आहे, अशी भूमिका शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली.
भूम येथील संवाद सभेत ते बाेलत हाेते. मंचावर खासदार संजय राऊत, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, शंकर बाेरकर, जिल्हाप्रमुख रणजित पाटील, मकरंद राजेनिंबाळकर आदींची उपस्थिती हाेती.
ठाकरे म्हणाले, आज शेतीमालास भाव मिळत नाही. तरुणांना राेजगार नाही. मात्र, निवडणुका आल्या की घाेषणांचा पाऊस पाडला जात आहे. निवडणुका झाल्या की पुन्हा महागाईचा मार सुरू हाेतो. त्यामुळे यावेळी मतदारांनी अशा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.