उमरगा : सध्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सौम्य लक्षणे असलेल्या व ज्यांना गृह विलगीकरणाची सुविधा उपलब्ध नाही, अशा रुग्णांसाठी उमरगा शहरात सर्व सुविधांयुक्त कोविड केअर सेंटरची आवश्यकता भासत आहे. ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेच्यावतीने उमरगा शहरात सुसज्ज असे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. मंगळवारी त्याचा शुभारंभ करण्यात आला.
माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी शिवसैनिकांना हे कोविड सेंटर उभारण्याबाबत सूचना दिल्या होत्या. यानुसार आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली व किरण गायकवाड यांनी विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांसोबत टीम तयार करून अल्पावधीतच मिनाक्षी मंगल कार्यालय येथे हे सुसज्ज असे कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घेतला. यासाठी शासनाकडून रितसर परवानगी घेऊन याची सुरूवात मंगळवारी करण्यात आली. यावेळी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना पेहराव आहेर करून शिवसेनेच्यावतीने या सर्व कर्मचाऱ्यांचा दोन लाखांचा विमा काढून देण्यात आला.
या कोविड केअर सेंटरमधील रुग्णांसाठी रुग्णवाहिका, सकाळी काढा, चहा व नाश्ता तसेच दुपारी व रात्री सकस आहार देण्यात येणार आहे. तसेच येथील रुग्णांकडून नियमित व्यायाम, तज्ज्ञ डॉकटरांकडून वेळोवेळी तपासणी करण्यात येणार आहे. कार्यक्रमास माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, किरण गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे, बाजार समितीचे सभापती मोहयोद्दीन सुलतान, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, पालिकेतील गटनेते संतोष सगर, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, शहरप्रमुख राजेंद्र सूर्यवंशी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधीर पवार, सचिन जाधव, योगेश तपसाळे, शरद पवार, खयूम चाकूरे, प्रदीप मदने, प्रशांत पोचापुरे, साई विभूते, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख संदीप चौगुले, विक्रम शहापुरे, ओम जगताप, अमित माने, काका गायकवाड, पंकज जगताप, हैदर शेख, प्रवीण साठे, महादू क्षीरसागर आदी उपस्थित होते.