उस्मानाबाद : महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. युती-आघाडीला छेद देऊन सातत्याने वेगळा प्रयोग करणाऱ्या उस्मानाबादेत यावेळी पदवीधरच्या निमित्ताने मात्र गळ्यात-गळे दिसू लागले आहे. स्थापनेपासूनच राष्ट्रवादी ही सेनेची क्रमांक एकची शत्रू राहिलेली. मात्र, या निवडणुकीत पहिल्यांदाच ते एकत्र दिसून आले आहेत.
राजकीय प्रयोगाच्या बाबतीत उस्मानाबाद नेहमीच चर्चेत राहिलेला जिल्हा आहे. विशेषत: जिल्हा परिषदेत असे प्रयोग यापूर्वी पाहायला मिळाले. राज्यात भाजप-सेनेची युती असताना उस्मानाबाद जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी-भाजपची युती जिल्ह्याने अनुभवली. त्यानंतरही या टर्मला जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीतही राजकारणाचे अजब रसायन पहायला मिळाले. राज्यात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस सहभागी असतानाही या निवडीत सेनेचा एक गट तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीतच असलेल्या (भाजपच्या) एका गटाला जाऊन मिळाला व सत्ता स्थापन केली. हे दोन्ही प्रयोग केवळ शिवसेनेला रोखण्यासाठी करण्यात आले होते व ते यशस्वी झालेही. मात्र, सध्या लागलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्वच पक्ष एकत्र आल्याचे दिसते आहे. विशेषत: शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी आघाडी धर्म म्हणून राष्ट्रवादीचे (महाविकास आघाडीचे) उमेदवार सतीश चव्हाण यांच्यासाठी त्यांच्या मंचावर जाऊन भाषणे दिली. शिवसेनेने राष्ट्रवादीला साथ देणे, हे जिल्ह्यात पहिल्यांदाच घडले आहे.
हे का व कसे घडले..?मुळातच शिवसेना व राष्ट्रवादीत सख्य असण्याचे कोणतेही कारण आजवर नव्हते. मात्र, वर्षभरापूर्वी महाविकास आघाडीच्या राज्यातील प्रयोगाने हे साध्य झाले. असे असले तरी उस्मानाबादच्या राजकारणात पाटील व राजेनिंबाळकर कुटुंबाचे चांगलेच वर्चस्व आहे. कलहातून दोन्ही कुटुंबे वेगवेगळ्या पक्षात आहेत. माजी मंत्री आ.राणाजगजितसिंह पाटील व खा.ओम राजेनिंबाळकर यांच्यात वर्चस्वाची लढाई आहे. यामुळे पक्षाला विरोध कमी अन् व्यक्तिगत विरोध जास्त पहायला मिळतो.