धाराशिव : शहरातील चिखल व राड्यावरुन प्रशासन तसेच राज्य सरकारवर चिखलफेक करीत उबाठा शिवसेनेने मंगळवारी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. विसर्जन विहीर परिसरातील डबक्यात बसून कार्यकर्त्यांनी पाण्यात कागदाच्या होड्या सोडत सरकार व प्रशासनाचा निषेध केला.
धाराशिव शहरात भुयारी गटारीसाठी झालेल्या खोदकामामुळे प्रचंड चिखल व राडा तयार झाला आहे. त्यातच नालेसफाई व्यवस्थित झाली नाही. त्यामुळे पाणी तुंबून रस्त्यावर आल्याने मंगळवारी गुडघाभर चिखल व पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागत होती. दरम्यान, या परिस्थितीला शिंदे-फडणवीस सरकार व पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली. काही दिवसांपूर्वीच निवेदन देऊन उपाययोजना तातडीने न झाल्याने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता.
त्यानुसार मंगळवारी शहराध्यक्ष सोमनाथ गुरव, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, पंकज पाटील, मनोज पडवळ, नाना घाडगे, पंकज पडवळ, रवी कोरे, राणा बनसोडे, संकेत सूर्यवंशी, नितीन शेरखाने यांच्यासह कार्यकर्त्यांनी शहरातील विसर्जन विहिरीजवळील चिखलाने माखलेल्या रस्त्यातील पाण्याच्या डबक्यात बसून आंदोलन केले.
यावेळी राज्य सरकार, पालकमंत्री, पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सरकारने कामांना स्थगिती दिल्यानेच शहरात ही स्थिती उद्भवली असून, यामुळे शहरवासियांचे हाल होत असल्याचा आरोप सोमनाथ गुरव यांनी यावेळी केला. पावसानंतर होणारी संभाव्य स्थिती लक्षात घेऊन स्थगिती उठवून कामांना गती दिली असती तर ही वेळ शहरवासियांवरच आलीच नसती, असाही आरोप करण्यात आला.