लोहारा (जि. धाराशिव) : शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बालाजी कंट्रक्शनच्या विरोधात भिकमागो आंदोलन करण्यात आले. यातून जमा झालेले ७०७ रुपये पाेस्टाने ‘त्या’ संस्थेला पाठविण्यात येणार आहेत.
लोहारा शहरामध्ये विकास कामे सुरू आहेत. काही ठिकाणच्या कामाच्या अंदाजपत्रकामध्ये बंदिस्त नाली आहे. ते काम अंदाजपत्रकानुसार करणे गरजेचे असताना कामे अंदाजपत्रकानुसार न करता नालीवर छत टाकत असताना तेथील नागरिकांकडून फरशी घेऊन तेथे छत टाकण्यात आले. तसेच ज्या नागरिकांनी छत टाकण्यासाठी फरशी दिली नाही, अशा नागरिकांच्या घरासमोरील नालीवर छत टाकण्यात आले नाही. आजही काही ठिकाणी हे छत टाकण्यात आले नाही, असा आराेप करीत शिवसेनेच्या वतीने बालाजी कंट्रक्शनच्या विरोधात भिकमागाे आंदाेलन केले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते प्रभाग क्रमांक १७ पर्यंत भिक मागून जमा झालेले ७०७ रुपये पाेस्टाने ‘त्या’ संस्थेला पाठविण्यात आले. आंदाेलनात शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शहरप्रमुख सलीम शेख, नगरसेवक प्रशांत काळे, माजी नगरसेवक श्याम नारायणकर, महेबूब गवंडी, युवक कॉंग्रेसचे शहरप्रमुख हरी लोखंडे, दत्ता स्वामी, रघुवीर घोडके, युवासेना शहरप्रमुख दिनेश गरड, प्रेम लांडगे, गोविंद बंगले, महेश बिराजदार, आमिर शेख, अजित घोडके, बालाजी माशाळकर, हामजा खुट्टेपड, बळीराम गोरे, अक्षय सगट, शिवा सुतार, मोहन वचने, तुकाराम वाळके, परमेश्वर चिकटे आदी सहभागी झाले हाेते.