उस्मानाबाद : कोरोना कालावधीत संसर्गामुळे पालकांचा मृत्यू होऊन अनेक बालके अनाथ झाली आहेत. या बालकांसाठी शासनाकडून योजना राबविली जात आहेच; मात्र सोबतच जिल्हा शिवसेनेच्यावतीने त्यांचे पालकत्व स्वीकारत अनाथ बालकांच्या नावे १ लाख रुपयांची ठेव ठेवून त्यांचे भवितव्य सुकूर करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली.
कोरोना काळात अनेक कुटुंबांची भरुन न निघणारी हानी झाली आहे. कोणाचे वडील गेले तर कोणाची आई. काही जणांचे तर दोन्ही पालक मृत्युमुखी पडले. अगदी बालपणातच अनाथपण वाट्याला आलेले. अशावेळी शासनाने त्यांना मदतीचा हात देऊन जबाबदारी स्वीकारण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. सोबतच शिवसेनाही मदतीला धावली आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलेले ८० टक्के समाजकारणाचे ब्रीद जपत अनाथ झालेल्या बालकांचे पालकत्व स्वीकारण्याचा मोठा निर्णय जिल्हा शिवसेनेने घेतल्याचे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांनी सांगितले. अनाथ बालकांच्या नावे तातडीची मदत म्हणून १ लाख रुपयांची मुदतठेव ठेवण्यात आली आहे. ही मदत त्यांना भविष्यात मोलाची ठरेल. या मुदतठेवीचे प्रमाणपत्र या बालकांना रविवारी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते व नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, गटनेते सोमनाथ गुरव, शहरप्रमुख संजय मुंडे, श्यामराव शिंदे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली ही मोठी पोकळी भरून काढण्याचा शिवसेनेचा छोटासा प्रयत्न आहे. त्यांना या काळात साथ देणे हे समाज म्हणून आपले कर्तव्य आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी पेलतच आहेत. त्यांच्या शिकवणीप्रमाणे हा निर्णय घेत या पाल्यांचे पालकत्व शिवसेना स्वीकारत असल्याचे आमदार कैलास पाटील यावेळी म्हणाले.