शिवसेनेत जल्लोष! लोहारा नगराध्यक्षपदासाठी वैशाली खराडेंचा एकमेव अर्ज;कॉंग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 03:49 PM2022-02-11T15:49:31+5:302022-02-11T15:59:11+5:30
कॉग्रेसचे प्रशांत काळे यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
लोहारा (उस्मानाबाद ): लोहारा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना-राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडीकडून शिवसेनेच्या वैशाली अभिमान खराडे तर काँग्रेसकडून प्रशांत काळे यांनी मंगळवारी अर्ज दाखल केले होते. परंतु, कॉग्रेसचे प्रशांत काळे यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे शिवसेनेच्या वैशाली खराडे या बिनविरोध नगराध्यक्ष होणार हे स्पष्ट झाले आहे. निवडीची अधिकृत्त घोषणा सोमवारी १४ फेब्रुवारी रोजी होईल.
लोहारा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जाहीर केल्यानंतर मंगळवारपासून नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान, नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून तब्बल ११ जागावर विजय मिळविला आहे. यात शिवसेनेने नऊ, राष्ट्रवादी कॉंग्रेस दोन तर काँग्रेसला चार जागा मिळाल्या आहेत. यात दोन अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडे स्पष्ट बहुमत असल्याने आघाडीचाच नगराध्यक्ष होणार हे स्पष्ट होते.
दरम्यान, मंगळवारी शिवसेनेच्या वैशाली अभिमान खराडे यांनीअर्ज दाखल केला. तर काँग्रेसकडून प्रशांत काळे यांनी ही अर्ज दाखल केला. दोघांचेही अर्ज वैध ठरले. यामुळे नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार का ? अशी चर्चा रंगली होती. दरम्यान, आज प्रशांत काळे यांनी पक्ष आदेशानुसार आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवसेनेच्या वैशाली खराडे या बिनविरोध नगराध्यक्ष होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या निवडीची अधिकृत्त घोषणा सोमवारी विशेष सभेमध्ये होईल. त्यानंतर उपनगराध्यक्ष पदाची निवड केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी गजानन शिंदे व कार्यालयीन अधिक्षक जगदिश सोडगे यांनी सांगितले आहे.